Dams in Nashik District Overflowed: गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाणी साचले असून जवळपास सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. या परिस्थितीत हवामान खात्याने नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील काही भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांतून पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
प्राप्त माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील 14 धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत, तर 24 मोठ्या व लहान धरणांमधील पाणीसाठा 85 टक्क्यांवर पोहोचला आहे. गंगापूर, दारणा, मुकणे, नांदूरमध्यमेश्वर, गिरणा व चणकापूर यांसारख्या प्रमुख धरणांत पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. विशेषत: गंगापूर धरणात 84.25 टक्के, दारणा धरणात 87.37 टक्के, मुकणे धरणात 95.18 टक्के, नांदूरमध्यमेश्वरात 96.50 टक्के, गिरणा धरणात 69.94 टक्के, तर चणकापूर धरणात 70 टक्के पाणीसाठा आहे.
हेही वाचा - Vasai Streets Turn White: वसईतील रस्त्यावर आला दुधाचा पूर! काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या
जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे की, जर पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर गंगापूर धरणातून पाणी सोडावे लागेल. यामुळे गोदावरी नदीची पाण्याची पातळी अचानक वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच जिल्ह्यातील इतर 11 धरणांतूनही विविध प्रमाणात पाणी सोडले जात आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांवर पावसाचा अनिश्चित परिणाम होत असून, काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, धरणे भरल्याने पाणीपुरवठ्याची चिंता दूर झाली आहे.
हेही वाचा - Marbat Festival 2025: 'ईडा पीडा, रोगराई घेऊन जा गे मारबत'; नागपूरची आगळीवेळी ऐतिहासिक परंपरा
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, नदीकाठच्या भागातील गावांनी खबरदारी घ्यावी. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणांवर लक्ष ठेवावे. महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा जोर कायम आहे. तथापी, नाशिक जिल्ह्यासाठी हवामान खात्याने आज रेड अलर्ट जाहीर केल्याने प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा सतर्क मोडवर आहेत.