कोल्हापूर: पट्टणकोडोलीमध्ये गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाची परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जुना बस स्थानक येथे बसविण्यात आला होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विना परवाना असल्यामुळे ते हटवण्यासाठी इचलकरंजीचे डीवायएसपी समीर साळवे यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना तीव्र विरोध करत आहेत. 'पुतळा एक इंच सुद्धा हलवू देणार नाही', असे म्हणत हिंदुत्ववादी संघटनांनी 400 ते 500 मावळे पुतळ्याजवळ जमवून आहेत. त्यामुळे सध्या पट्टणकोडोलीमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे आणि परिसरात जमावबंदी लावण्यात आली आहे.
या ठिकाणी इचलकरंजीच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले, अप्पर तहसीलदार सुनील शेरखान यांच्यासोबत दोनशे पोलीस तैनात केल्यामुळे पट्टणकोडोली गावाला छावणीचे स्वरूप आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना:
पट्टणकोडोली बस स्थानक येथे बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे तसाच राहू द्या. फक्त तो झाकून ठेवण्यात यावा. आपण त्याची परवानगी लवकरात लवकर देऊ. त्यानंतर पुतळा खुला करण्यात यावा', अशी सूचना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती मिळाली.
शिवभक्तांची मागणी:
मागील अनेक वर्षांपासून पट्टणकोडोलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा पुतळा व्हावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून होत होती. मात्र काही वर्षांपूर्वी घडलेल्या जातीय दंगलीमुळे पट्टणकोडोलीमध्ये कोणताही पुतळा बसवण्याची परवानगी नाही.