Wednesday, August 20, 2025 07:36:08 AM

मुंबईत मुसळधार पाऊस! जुहू-अंधेरीमध्ये वाहतूक ठप्प, नागरिकांना समुद्रापासून दूर राहण्याचा इशारा

गेल्या काही तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. विशेषतः जुहू आणि अंधेरीसारख्या पॉश परिसरांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस जुहू-अंधेरीमध्ये वाहतूक ठप्प नागरिकांना समुद्रापासून दूर राहण्याचा इशारा
Heavy rains in Mumbai
Edited Image

मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबई पुन्हा एकदा मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे ठप्प झाली आहे. गेल्या काही तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. विशेषतः जुहू आणि अंधेरीसारख्या पॉश परिसरांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने उंच लाटांचा इशारा देत नागरिकांना समुद्राजवळ न जाण्याचे आवाहन केले आहे.

जुहू-अंधेरी परिसर जलमय

मुंबईतील प्रसिद्ध जुहू परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने पादचाऱ्यांना व वाहनचालकांना हाल सहन करावे लागत आहेत. त्याचप्रमाणे, अंधेरी भागातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक संथ झाली आहे. अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

हेही वाचा - Mumbai Train Blast Verdict: मुंबई लोकल साखळी बॉम्ब स्फोटप्रकरणी 12 आरोपी निर्दोष

रेल्वे सेवा सुरळीत

मुंबईत मुसळधार पाऊसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सध्या सामान्य असून गाड्या वेळापत्रकानुसार धावत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 48 तास मुंबईसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून वीज कोसळणे आणि वादळाचा धोका देखील वर्तवण्यात आला आहे. 

हेही वाचा - Sanjay Raut: महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होणार; संजय राऊतांचा दावा

जलाशयांची पातळी वाढली

दरम्यान, पावसामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात मोठी सुधारणा झाली आहे. बीएमसीच्या 19 जुलैच्या आकडेवारीनुसार, सात प्रमुख जलाशयांतील पाणीसाठा 81.86% वर पोहोचला आहे, जो 11.84 लाख दशलक्ष लिटरच्या आसपास आहे. या जलाशयांमध्ये अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी यांचा समावेश आहे.
 


सम्बन्धित सामग्री