Wednesday, August 20, 2025 04:36:33 AM

पुण्यात भीषण अपघात! औंधमध्ये दुचाकी घसरून कारखाली आलेल्या 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

मृत व्यक्तीचे नाव जगन्नाथ काशीनाथ काळे असे आहे. ते रोजच्या प्रमाणे सकाळी आपल्या दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला.

पुण्यात भीषण अपघात औंधमध्ये दुचाकी घसरून कारखाली आलेल्या 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Edited Image

पुणे: औंध येथील राहुल हॉटेलजवळ मंगळवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका 61 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. खड्ड्यांमुळे दुचाकी घसरल्यामुळे हा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. मृत व्यक्तीचे नाव जगन्नाथ काशीनाथ काळे असे आहे. ते रोजच्या प्रमाणे सकाळी आपल्या दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला. 

राहुल हॉटेलजवळील रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यात काळे यांची दुचाकी पावसामुळे घसरली. त्यावेळी रस्त्यावर चिखल साचलेला होता. त्यामुळे काळे यांना खड्डा नीट न दिसल्याने ते दुचाकीवरून कोसळले. त्याचवेळी मागून आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांना चिरडले. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तत्काळ काळे यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा - Shirur Crime: शिरुरमध्ये जमिनीच्या वादातून गोळीबार; तीन जणांवर गुन्हा दाखल

पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पुण्यात अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून अशा घटनांमुळे नागरिकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात असे अपघात घडत असले तरी पुणे महानगरपालिका केवळ आश्वासनेच देताना दिसते, असा आरोप स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

हेही वाचा यवत कसं पेटलं?, यवतमधील परिस्थितीवर काय म्हणाले फडणवीस?

नागरिकांमध्ये संताप - 

रहिवाशांनी PMC विरुद्ध संताप व्यक्त करत दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पुणेकरांचा जीव खड्ड्यांमुळे धोक्यात आल्याची भावना अनेक स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आज घडलेल्या अपघाताचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता तरी पुणे महानगरपालिकेला जाग येईल का? असा सवाल पुणेकर विचारू लागले आहेत.
 


सम्बन्धित सामग्री