Mumbai-Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, ज्याला यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे म्हणूनही ओळखले जाते. बुधवार, 27 ऑगस्ट रोजी सकाळपासून हा महामार्ग प्रचंड वाहतूक कोंडीमुळे ठप्प झाला. गणेश चतुर्थीपासून सुरू होणाऱ्या दहा दिवसीय गणेशोत्सवासाठी हजारो नागरिक आपल्या गावी, विशेषतः कोकणाकडे जात असल्याने महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव मानला जातो. घरोघरी, मंडळांमध्ये आणि सोसायटीमध्ये गणपती बाप्पाचे स्वागत मोठ्या थाटामाटात केले जाते. विशेष म्हणजे कोकण हा या उत्सवाचा सांस्कृतिक गड असून येथे गणेशभक्त पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा, उत्साह आणि सामुदायिक भावनेने बाप्पाचे स्वागत करतात. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भाविक कोकणात जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. यामुळेच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी गर्दी झाली.
दर आठवड्याच्या शेवटी या एक्सप्रेसवेवर गर्दी होत असते. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांचा ताफा इतका मोठा होता की, महामार्गावर कार, बस आणि ट्रकांच्या रांगा तासन्तास न हलता उभ्या राहिल्या. पुण्याच्या घाटमाथ्यावरही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून वाहनांची मोठी कोंडी झाल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा - Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटीलांची मुंबईकडे कूच , कसा असणार प्रवास ?
सोशल मीडियावरही या वाहतूक कोंडीचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. एका प्रवाशाने प्लॅटफॉर्म X वर सकाळपासून सुरू असलेल्या संथ गतीच्या वाहतुकीचे फोटो शेअर केले. त्यात महामार्गावर शेकडो वाहने रांगेत अडकलेली दिसत आहेत. वाहतूक पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. वाहनचालकांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले असून शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे.
हेही वाचा - Pune Metro: पुणेकरांसाठी गणेशोत्सवात खास सेवा; दर 3 मिनिटांनी धावणार गाड्या, प्रवाशांना दिलासा
गणेशोत्सव काळात मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या दरवर्षी झपाट्याने वाढत आहे. रेल्वे, एसटी बसेस आणि खासगी वाहतुकीसोबत वैयक्तिक वाहनांचा वापर वाढल्याने रस्त्यांवरील ताण अधिकच वाढतो. या पार्श्वभूमीवर दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीचे नियोजन हा वाहतूक विभागासाठी मोठा प्रश्न ठरतो. यंदाही नेमकीसारखीचं परिस्थिती निर्माण झाली असून कोकणाकडे जाणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. मात्र या सर्व गर्दीच्या आणि अडचणीच्या पार्श्वभूमीवरही गणेशभक्तांमध्ये आपल्या बाप्पाला घरी आणण्याचा उत्साह कायम असल्याचे दिसून येते.