पुणे: पुण्यात अनंत चतुर्थीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अशातच पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे पुण्यातील वादकांमध्ये आनंदाची बातमी पसरली आहे. पुण्यातील ढोल ताशा पथकांच्या संख्येवर सक्ती न करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पथकांची संख्या आणि पथकामधील सदस्यांची संख्या यावर सक्ती केली जाणार नाही अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे गणेश मंडळांना ढोल पथके लावण्याच्या परवानगीबाबतचा गोंधळ अखेर मिटला आहे.
अनेक दिवसांपासून पुण्यात विसर्जन मिरवणुदरम्यान गणेश मंडळांनी किती ढोल ताशा पथके लावायचे असा प्रश्न उपस्थित केला जात होता. ढोल ताशा पथकांवर मर्यादा यावी अशी मागणी वेगवेगळ्या स्तरातून केली जात होती. पुण्यातील मानाचे गणपती आणि इतर प्रमुख मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा पथकांच्या संख्येवर आणि वादकांच्या सदस्य संख्येवर निर्बंध घालण्यात यावे अशी देखील मागणी अनेकजणांनी केली. यानंतर ढोल ताशा महासंघ, शहरातील प्रमुख ढोल ताशा पथके आणि पुणे पोलिसांमध्ये अनेकवेळा बैठका झाल्या. गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर ढोल ताशा महासंघाकडून आणि इतर ढोल ताशा पथकांकडून विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा पथकांच्या संख्येवर आणि सदस्य संख्येवर मर्यादा आणल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती.
हेही वाचा: Pune Ganpati Visarjan 2025: पुण्यातील मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीचे संपूर्ण वेळापत्रक आणि मार्ग जाहीर
आज पुन्हा पुणे पोलिसांनी ढोल ताशा महासंघ आणि इतर ढोल ताशा पथकांशी चर्चा केली. त्यानंतर यातून मार्ग काढण्यात आला आहे. पोलिसांच्या निर्णयामुळे गणेश मंडळांचा आणि ढोल ताशा पथकांसमोरचा प्रश्न मिटला आहे.
गणपती विसर्जनादरम्यान ढोल ताशा पथकांची संख्या व त्यामधील सदस्यांची संख्या याबद्दल प्रश्न निर्माण झाला होता. यावर जोपर्यंत गणपती मंडळ ठरलेल्या वेळेचे पालन करतील तोपर्यंत पुणे पोलिसांकडून पथकांची संख्या व पथकामधील सदस्यांची संख्या यावर सक्ती केली जाणार नाही, अशी माहिती सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे. यामुळे पुण्यातील गणपती विसर्जनावेळी मोठी धूम पाहायला मिळणार आहे.