कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे जोरदार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात धुवाँधार पाऊस सुरू आहे. पाणी वेगाने वाढत आहे. 16 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
मंगळवारी पंचगंगा नदी इशारा पातळीजवळ पोहोचली. दिवसभरात तीन फुटांची वाढ होऊन रात्री 11 वाजता पाणी पातळी 38 फूट 1 इंचावर पोहोचली होती. राजाराम बंधारा येथील पातळी 38.1 फुटांवर होती.
पंचगंगेच्या पुराचे पाणी गायकवाड वाड्याजवळ आल्याने गंगावेशकडून शिवाजी पुलाकडे जाणारा मार्ग वाहतुकीस बंद झाला. तसेच कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर मांडुकली, कोल्हापूर - दाजीपूर मार्गावर फेजिवडे तर कोल्हापूर - राजापूर मार्गावर बाजार भोगाव ते पोहाळे दरम्यान पुराचे पाणी आल्याने तळकोकण व गोव्याकडे जाणारे तीन मार्ग बंद झाले आहेत. सोमवारी सकाळपासून मंगळवारी सकाळपर्यंत 24 तासांत 5.8 फुटांनी पाण्याची पातळी वाढली. यावरून पावसाची तीव्रता लक्षात येते.
हेही वाचा - Kolhapur Rain Update : कोल्हापुरात कोसळधार! जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्याखाली.. या रस्त्यांवर पाणी
जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे 200 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे. याशिवाय 4 राज्यमार्ग, 12 प्रमुख जिल्हा मार्ग व 11 ग्रामीण मार्गावर पाणी आल्याने एसटीच्या 8 फेर्या बंद झाल्या आहेत. पुराचे सावट गडद होत आहे. लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पावसाचा जोर गेल्या दोन दिवसांपासून कायम आहे. मंगळवारी शहरात दिवसभर लहान-मोठ्या सरी सुरू होत्या. अशाच पद्धतीने आज बुधवारीही पाऊस सुरू आहे. अधूनमधून तुरळक ऊनही पडत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाची होच स्थिती आहे. काही ठिकाणी पावसाचा जोरही होता. गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील 12 तालुक्यांत एकूण 884.5 मि.मी. पाऊस झाला आहे. याशिवाय शहरातही अतिवृष्टी (67 मि.मी.) झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. राधानगरी धरणाचा सोमवारी रात्री बंद झालेला स्वयंचलित दरवाजा मंगळवारी पहाटे पुन्हा खुला झाला. धरणाच्या सातही दरवाजातून 11 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
धरणातून विसर्ग वाढविला
दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे धरणातील एकूण विसर्ग वाढवून 20,000 घनफूट प्रतिसेकंद विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून विसर्ग वाढवला असून 2910 क्युसेक पाणी कुंभी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. कासारी धरणातून येत्या चोवीस तासात विसर्ग वाढवण्यात येईल. 1500 क्युसेकपर्यंत पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. धामणी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने चौके पुलावरील पादचारी व दुचाकी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. सकाळी अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने मार्ग वाहतुकीस बंद झाला होता. दुपार पर्यंत घाट वाहतूक सुरळीत झाली.
गगनबावड्यात 151.3 मि. मी. पाऊस
गेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 151.3 मि. मी. पाऊस झाला आहे. यानंतर भुदरगड 92.2, राधानगरी 91.8, शाहुवाडी 77, कागल 72, पन्हाळा 70.9, आजरा 66.9, चंदगड 65.4, करवीर 59.9, गडहिंग्लज- 51.9, हातकणंगले 50.8, शिरोळ 34.4 इतका पाऊस झाला.
पुराच्या पाण्यामुळे 27 मार्ग बंद
राज्यमार्ग : 4 / प्रमुख जिल्हा मार्ग : 12 / इतर जिल्हा मार्ग 1 / ग्रामीण मार्ग : 10
राधानगरीतील गावांत सर्वाधिक अतिवृष्टी
हातकणंगले तालुक्यात हुपरी, पन्हाळा तालुक्यात पन्हाळा, कळे, बाजार भोगाव, कोतोली, वाडी रत्नागिरी, शाहूवाडीत भेडसगाव, बांबवडे, करंजफेन, सरुड, मलकापूर, राधानगरीत राधानगरी, सरवडे, कसबा तरळे, आवळी बुद्रुक, राशिवडे बुद्रुक, कसबा वाळवे, गगनबावड्यात साळवण, करवीरमध्ये सांगरुळ, शिरोली दुमाला, बीड, हळदी, कागलमध्ये कापशी, खडकेवाड, मुरगुड, बिंद्री, गडहिंग्लजमध्ये नेसरी, भुदरगडमध्ये गारगोटी, पिंपळगाव, कुर, कराडवाडी, आजर्यात आजरा, मलिग्रे, चंदगडमध्ये चंदगड, नारंगवाडी, मानगाव, तुक्रेवाडी, हेरे येथे जोरदार पाऊस झाला.
66 घरांची पडझड; 32 लाखांचे नुकसान
पूर्णत: पडलेली घरे : 01, कच्च्या घरांची पडझड : 66, बाधित गोठ्यांची संख्या : 1, जिवीत हानी : मोठी जनावरे - 1
अशा प्रकारे खासगी मालत्तेचे एकूण 32 लाख 7 हजारांचे नुकसान झाले आहे.
धरण क्षेत्रात झालेला पाऊस व सुरू असलेला विसर्ग
धरण प्रकल्प - पाऊस (मिमीमध्ये) - विसर्ग
राधानगरी - 221- 11500
तुळशी - 236 - 1500
वारणा - 92 - 18630
दुधगंगा - 199 - 7600
कासारी - 251 - 1500
कडवी - 159 - 1073
कुंभी - 305 - 1610
पाटगांव - 165 - 1462
चिकोत्रा - 172 - 600
चित्री - 105 - 431
जंगमहट्टी - 47 -634
घटप्रभा - 208 - 6380
जांबरे - 137 - 1497
आंबेओहोळ - 81- 259
सर्फनाला - 111 - 339
धामणी - 165 - 10243
कोदे - 256 - 1998
या मार्गावरील एसटी सेवा बंद
अतिवृष्टीमुळे कोल्हापूर - गगनबावडा, वाळवा - बाचणी, गडहिंग्लज - ऐनापूर, मलकापूर उखळू - शितळ, चंदगड - भोगोली / पिळणी / धामापूर / हिरे, राधानगरी पडळी - पिरळ / शिरगाव, आजरा - देवकांडगाव / सरोली या मार्गांवरील एसटी सेवा बंद आहे.
हेही वाचा - जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे चांदोली धरण 90.02 टक्के भरलं! एकाच दिवसात पाणीसाठ्यात पाऊण टीएमसीने वाढ