कोल्हापूर: शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीणी, जिचे गेल्या 35 वर्षांपासून ग्रामस्थांशी जिव्हाळ्याचे नाते आहे, तिला सोमवारी रात्री गुजरातमधील अंबानींच्या 'वनतारा' येथे पाठवण्यात आले होते. या घटनेमुळे, संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. परंपरेला धक्का बसल्याने जैन समाज आणि कोल्हापूरकर उदास आहेत. या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
या घटनेबाबत, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या दरम्यान, पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, 'पेटाकडून आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीबाबत सर्वोच्च न्यायालयात निर्णय देण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कोल्हापुरकरांची जुनी भावना, धार्मिक श्रद्धा आणि भावनिक नाळ तोडल्याचा आरोप होत आहे. महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला गावकऱ्यांपासून हिरावून घेतल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांनी महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला पुन्हा गावात आणण्यासाठी तातडीने पुढाकार घेत केंद्रीय मंत्री आणि वनमंत्री यांच्याशी संपर्क साधला. यासह, त्यांची वनतारा टीमसोबत देखील सविस्तर चर्चा झाली. कोल्हापुरकरांची भावना, श्रद्धा, आणि परंपरेचा इतिहास याबाबत वनताराला समजावून सांगितले.
महादेवी हत्तीणीला पुन्हा आणण्यासाठी 'स्वाक्षरी मोहीम'
गेल्या 35 वर्षांपासून ग्रामस्थांशी जिव्हाळ्याचे नाते असणाऱ्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला गावकऱ्यांपासून हिरावून घेतल्याने गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. यासह, महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांच्याकडून स्वाक्षरी मोहीम देखील घेण्यात आली होती. माहितीनुसार, महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी सव्वा दोन लाखांहून अधिक लोकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे.
वनतारा प्रशासन काय म्हणाले?
'सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच माधुरी आमच्या ताब्यात आली आहे. मात्र, कोल्हापूरकरांच्या भावना लक्षात घेता आम्ही पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत', अशी प्रतिक्रिया वनताराच्या प्रशासनाने दिली. वनताराचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, 'कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर महादेवी उर्फ माधुरी हत्तीणला परत केले जाईल'.