Wednesday, August 20, 2025 07:34:52 AM

Maharashtra Rain Update: राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु

18 दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडला आहे.

maharashtra rain update राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु

मुंबई : 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, आणि उर्वरित विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे होते.

1 ते 16 जून दरम्यान कोकण आणि गोवा उपविभागात सरासरीच्या 22 टक्के अधिक पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 1 टक्का कमी, मराठवाड्यात 26 टक्के कमी, आणि विदर्भात 61 टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यातील 134 तालुक्यांमध्ये एकूण पाऊस 65 मिलीमीटरहून अधिक पडला आहे आणि 84 तालुक्यांमध्ये सरासरी ते सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, हिंगोली, आणि बीड जिल्ह्यांसह खानदेशातील काही तालुक्यांमध्ये पावसाची घट लक्षणीय आहे.

हेही वाचा : उल्हासनगरात नाल्यावरील पूल कोसळतानाची घटना सीसीटीव्हीत कैद

22 जूनपर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याची शक्यता आहे. या भागांपेक्षा पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण थोडे अधिक राहू शकते. या सर्वच भागांमध्ये 22 तारखेपर्यंत मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची शक्यता नाही.

अद्याप ज्या भागांमध्ये चांगला पाऊस पडलेला नाही (प्रामुख्याने विदर्भात) त्या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.


सम्बन्धित सामग्री