Sunday, August 31, 2025 04:31:08 PM

नागपुरातील दंगेखोरांनी पैसे भरले नाही तर त्यांच्या मालमत्ता विकून वसूल करणार - फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत नागपूर दंगल परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.

नागपुरातील दंगेखोरांनी पैसे भरले नाही तर त्यांच्या मालमत्ता विकून वसूल करणार - फडणवीस
नागपुरातील दंगेखोरांनी पैसे भरले नाही तर त्यांच्या मालमत्ता विकून वसूल करणार - फडणवीस

नागपूरमध्ये नुकत्याच उसळलेल्या दंगलीनंतर राज्य सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. यात त्यांनी दंगलीदरम्यान झालेल्या नुकसान भरपाईसाठी सरकार मदत करणार आहे. तसेच दोषींना त्याची किंमत मोजावी लागेल असं सांगत नुकसानीची रक्कम दंगेखोरांकडून वसूल केली जाईल. गरज पडली तर दंगेखोरांच्या प्रॉपर्टी विकून सदरची भरपाई वसूल करू, असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूर हिंसाचार काही जणांच्या अफवा आणि चुकीच्या माहितीमुळे उसळला. कुराणची आयत असलेली चादर जाळल्याचा भ्रम पसरवून काही लोकांनी सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट टाकल्या आणि दंगल भडकावण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून आतापर्यंत ६८ हून अधिक सोशल मीडिया पोस्ट हटवण्यात आल्या आहेत.’

सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवणाऱ्या आणि दंगेखोरांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल. इतकेच नव्हे तर अशा लोकांना दंगेखोरांसोबत सहआरोपी बनवले जाणार आहे. या निर्णयामुळे समाजमाध्यमांवर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना चांगलाच धडा मिळेल, असा इशारा देखील फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिला.

हेही वाचा - संवेदनशील प्रशासनाचा पुढाकार, उपचारासाठी मदत मिळाल्याने वाचले रुग्णाचे प्राण

नागपूर दंगलीत झालेल्या नुकसानाची भरपाई सरकार करणार आहे असले तरी ती रक्कम दंगेखोरांकडून वसूल केली जाईल. लोक तोडफोड आणि जाळपोळ करताना दिसले आहेत, त्यांच्याकडूनच नुकसान भरपाई वसूल केली जाईल. जर त्यांनी पैसे दिले नाहीत, तर गरज पडली तर त्यांच्या संपत्तीचा लिलाव केला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - Maharashtra Weather Update : IMD चा इशारा!, महाराष्ट्रात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता

दरम्यान, या दंगलीप्रकरणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई करत १०४ जणांची ओळख पटवली आहे. त्यापैकी ९२ जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित १२ जण हे १८ वर्षांखालील असल्याने त्यांच्यावर वेगळ्या कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. दंगलस्थळी असलेल्या नागरिकांनी आणि पत्रकारांनी केलेल्या चित्रीकरणाच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

 

 

 


सम्बन्धित सामग्री