मुंबई : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत भाजपासोबत महायुती केल्यापासून ठाकरे गटातील अनेक लोकप्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याने शिंदे यांच्या पक्षफुटीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केलं गेलं. विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने चांगली कामगिरी करत 56 आमदार निवडून आणले. राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यावर ठाकरे गटातील आणखी लोकप्रतिनिधी संपर्कात असल्याचे सांगत शिवसेनेच्या नेत्यांनी सातत्याने ठाकरे गटात संभ्रमाचे वातावरण ठेवलंय. ठाकरे गटाच्या नेत्यांनी यावर वारंवार याचे खंडण केलं असलं तरी शिवसेना 'आपरेशन टायगर' होणार यावर ठाम आहे.
शिवसेनेकडून जाणीवपूर्वक अशा बातम्या पसरवल्या जात असून बीडच्या बातम्या रोखण्यासाठी पुड्या सोडल्या जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या खासदरांनी केलाय. ऑपरेशन टायगर असं कोणतंही मिशन नाही, या वावड्या असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे यांना आता त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार-खासदारांना सांभाळणे कठीण झाले आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
हेही वाचा : वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेलेल्या आरोपीला नोटीस देऊन सोडलं
बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा एकनाथ शिंदे पुढे नेत असल्याने शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक नेते काम करण्यास इच्छुक असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय. ठाकरे गटाचे आमदार शिवसेनेत येणार आपण ठाम असल्याचा दावा त्यांनी केलाय. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही ओरिजनल शिवसेना आहे. ठाकरे गटाचे खासदार हे ओरिजनल बाळासाहेबांचे विचार घेऊन जर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असतील तर त्यांना लोकशाहीमध्ये जाण्याचा अधिकार असल्याचा टोला भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांनी लगावलाय. शिवसेनेतील अनेक नेते पक्षफुटीत एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले, ठाकरे गटाला ठेच लागली तरी ते सुधारत नाहीत, शिंदे यांच्यासोबत जाऊन विकासाची कामे होणार असेल तर जायला काय हरकत आहे, असं सांगत भाजपाच्या दरेकर यांनी ठाकरे गटाच्या खासदारांना डिवचलं आहे.
भाजपाच्या 'ऑपरेशन लोटस' नंतर राज्याच्या राजकारणात शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा आहे. शिवसेनेत नाराज असलेले अनेक आमदार खासदार शिवेसना नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना नेते करत आहेत. ठाकरे गटाला राजकीय दबावाखाली ठेवण्याचा हा स्टंट खुबीनं शिवसेनेचे नेते करत आहेत. ठाकरे गट फुटणार अशा बातम्यांमुळे साहजिकच ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण होते. तसेच कोण जाणार? या प्रश्नानं त्यांच्याच पक्षात एकमेकांकडे संशयानं पाहिलं जातंय. शिवसेनेच्या या राजकीय खेळीचा परिणाम नक्कीच ठाकरे गटावर होतोय.