Sunday, August 31, 2025 06:28:29 AM

राजन साळवींचा मोठा निर्णय : शिवसेनेत प्रवेश, उद्धव सेनेला धक्का!

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज राजन साळवींचा शिवसेना प्रवेश

राजन साळवींचा मोठा निर्णय  शिवसेनेत प्रवेश उद्धव सेनेला धक्का

मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी कालच पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे ठाकरे गटातून बाहेर पडण्याचे संकेत मिळत होते. अखेर आज, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजन साळवी शिवसेनामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

राजन साळवी यांची ओळख मातोश्रीशी निष्ठावान नेते अशी होती. मात्र, विनायक राऊत यांच्याशी झालेल्या वादानंतर, उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या बाजूने घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचे मन दुखावले होते. त्यामुळेच त्यांनी ठाकरे गटाला सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया:
राजन साळवी यांच्या या निर्णयावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, “जो कोणी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्यासाठी आमच्या सोबत येईल, त्यांचे स्वागत आहे. गेल्या अडीच वर्षांत आम्ही लोकांसाठी 24x7 काम करणारे सरकार दिले आहे. यामुळेच आमदार, खासदार, नगरसेवक मोठ्या प्रमाणात आमच्या सोबत येत आहेत.”

शिंदे पुढे म्हणाले, “आम्ही लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी अशा कल्याणकारी योजना आणल्या आहेत. विकासाचा अजेंडा घेऊन जाणारे आमचे सरकार आहे. त्यामुळेच शिवसेनेत अनेक नेते प्रवेश करत आहेत.”

बंडानंतरही राजन साळवी ठाकरे गटातच होते!
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर अनेक आमदार शिंदे शिवसेनेत गेले होते. मात्र, त्यावेळी राजन साळवी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा फटका बसला होता. तरीही त्यांनी उद्धव ठाकरे गटात राहण्याचा निर्णय घेतला.

विनायक राऊतसोबतचा वाद ठरला निर्णायक!
विधानसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी राजन साळवी यांना मदत केली नव्हती आणि त्यामुळेच त्यांचा पराभव झाला होता. निवडणुकीनंतर राजन साळवी आणि विनायक राऊत मातोश्रीवर गेले होते. मात्र, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी “तुम्हाला दुसऱ्या पक्षात जायचे असेल तर दरवाजे उघडे आहेत” असे सुनावले होते.

या शब्दांनी दुखावलेले राजन साळवी अखेर एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता कोकणातील शिवसेना शिंदे गट अधिक बळकट होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

अंबादास दानवे काय म्हणाले ?
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राजन साळवी यांच्या शिवसेना प्रवेशावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, ज्या पक्षाने मोठा नेता बनवले, आमदार केले, त्या पक्षाला एका पराभवामुळे सोडणे हे सर्वात चुकीचे आहे. राजन साळवी चांगले नेते आहेत, मात्र त्यांचा हा निर्णय योग्य नाही. तसेच, नाराजी व्यक्त केल्यानंतर आदित्य ठाकरे भेटायला कशाला जातील, ते स्वतंत्र कामासाठी गेले असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. इंडिया आघाडी टिकली पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाला एकत्रित विरोध करायला हवा. तसेच, राजन साळवी हे रत्नागिरीच्या एका मतदारसंघाचे आमदार होते, त्यामुळे संपूर्ण पक्षावर याचा मोठा परिणाम होणार नाही, असेही दानवे यांनी सांगितले.

काल रात्री दिल्लीत मोठी राजकीय घडामोड घडली, जेव्हा प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे गटाचे तीन खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते. ही उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे, कारण उद्धव ठाकरेंचे खासदार सातत्याने शिवसेनेच्या संपर्कात येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गटातील काही खासदार शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


सम्बन्धित सामग्री