सिंधुदुर्ग: आळस, थकवा आणि तणाव दूर करण्याबरोबरच उत्तम आरोग्यासाठी पोहणे हा एक उत्तम पर्याय मानला जातो. अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात विविध ठिकाणी योग दिन साजरा करण्यात येत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातही योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र वेंगुर्ले येथे योग दिनाची साजरी करण्याची पद्धत विशेष आकर्षण ठरली.
वेंगुर्ला नगरपरिषदच्या सिंधुसागर जलतरण तलावामध्ये प्रशिक्षक दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्यात प्रात्यक्षिकाद्वारे योग सादर करण्यात आला. या आगळावेगळ्या उपक्रमात फ्लोटिंग, अंडरवॉटर योग, प्राणायाम आणि हास्य योग असे विविध प्रकार सादर करण्यात आले. जलतरण तलावातील पाण्यात योग प्रात्यक्षिक सादर करण्याची ही पद्धत स्थानिक नागरिकांसाठी आणि उपस्थितांसाठी एक वेगळीच अनुभूती ठरली.
जलतरणासारख्या क्रियेचा योगासोबत सुंदर संगम साधत वेंगुर्लेतील या उपक्रमाने आरोग्य आणि मनःशांतीचा अनोखा संदेश दिला. योग दिनाच्या निमित्ताने केलेला हा उपक्रम एक प्रेरणादायी उदाहरण ठरला.
हेही वाचा:Pandharpur Wari 2025 Wishes: खास शुभेच्छा, प्रेरणादायी कोट्स आणि महत्वाची माहिती
योग दिनाविषयी:
दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. संपूर्ण जगभरात योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यंदाचा योग दिनही विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडला.