Saturday, September 06, 2025 05:36:48 AM

वनराज आंदेकर हत्या प्रकरणाचे गूढ उकलणार; पोलिसांचे 1700 पानांचे दोषारोपपत्र दाखल

कौटुंबिक वादातून माजी नगरसेवक वनराज आंदेकरची 1 सप्टेंबर 2024 च्या रविवारी हत्या करण्यात आली होती.

वनराज आंदेकर हत्या प्रकरणाचे गूढ उकलणार पोलिसांचे 1700 पानांचे दोषारोपपत्र दाखल

पुणे : कौटुंबिक वादातून माजी नगरसेवक वनराज आंदेकरची 1 सप्टेंबर 2024 च्या रविवारी हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात वांदेकरच्या दोन बहिणी आणि मेहुणे यांच्यासह 21 आरोपींविरुद्ध गुन्हे शाखेने न्यायालयात तब्बल 1700 पानी दोषारोपपत्र विशेष न्यायाधीश व्ही .आर कचरे यांच्या न्यायालयात दाखल केले आहे. याप्रकरणी तब्बल 39 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या असून, नाना पेठ घटनास्थळावरील, आंबेगाव पठार, दापोली (रत्नागिरी) या तीन ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज, आरोपीची ओळख परेड, आरोपींचे पूर्वीचे गुन्हे रेकॉर्ड आणि आरोपींचे मोबाईलवरुन एकमेकांशी झालेल्या संपर्काबाबत तांत्रिक विश्लेषण आदी विविध महत्वपूर्ण मुददे नमूद करण्यात आले आहेत. या आरोपींची मोक्का अंतर्गत मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण?
बहिणीच्या सांगण्यावरून माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येचा कट रचला गेला. कौटुंबिक आणि प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या करण्यात आली. 1 सप्टेंबर 2024 च्या रविवारी आंदेकरची हत्या झाली. हत्येप्रकरणी वनराजच्या दोन्ही बहिणी आणि नवऱ्यांना अटक झाली. बहिण संजीवनी कोमकर यांचे नाना पेठेत जनरल स्टोअर्स होते. या दुकानावर मनपा अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. ही कारवाई वनराज आंदेकर याच्या सांगण्यावरुन केल्याचा संशय होता. संजीवनी कोमकर कुटुंबियाचे आंदेकर याचे कुटुंबियाबरोबर मालमत्तेवरुनही वाद होते. वांदेकर त्यांना वारंवार धमकावत होता, त्याचा कोमकर यांना राग होता. बहिणीने वनराजला 'तुला पोरं बोलवून ठोकतेच' अशी धमकी सुद्धा दिली. वनराजला आपल्यावर कधीही हल्ला होऊ शकतो,याची जाणीव होती. त्यामुळे तो सतत आपल्या टोळीतील मुलांच्या घोळक्यातच असायचा. हल्ल्यांच्या दिवशी रविवारी घरगुती कार्यक्रम असल्याने त्याच्याबरोबर हा घोळका नव्हता. कार्यक्रम संपल्यानंतर तो रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास डोके तालीम जवळ येऊन थांबला होता. त्याचवेळी दुचाकीवरुन आलेल्या 10 ते  12 हल्लेखोरांनी आंदेकरवर  5 गोळ्या झाडल्या. 

हेही वाचा : भास्कर जाधव ठाकरे गट सोडणार का?, भास्कर जाधवांनी व्यक्त केली खंत व्यक्त

पुण्यातील टोळीयुद्धात आंदेकर टोळीचे वर्चस्व होतं. त्याचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी वनराजची बहिण आणि तिचा नवरा कोमकर या दोघांनी स्वतःची गँग तयार केली होती. याच वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


सम्बन्धित सामग्री