मुंबई : तुम्हाला तुमचे खर्च भागवण्यासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पैशांची आवश्यकता असेल, तर पर्सनल लोन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ही कर्जाची रक्कम बहुतेक वेळा फार मोठी नसते. तुम्हाला माहिती आहे का की, तुम्ही पर्सनल लोनचा इन्शुरन्स देखील मिळवू शकता? पर्सनल लोन इन्शुरन्स (Personal Loan Insurance) घेण्याचे अनेक फायदे आहेत. वाईट काळात कर्जाच्या ईएमआयच्या ओझ्यापासून काही काळापर्यंत वाचण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरू शकते. या विम्यासाठी कर्ज आणि त्याच्या व्याजाव्यतिरिक्त आणखी थोडी रक्कम भरावी लागते.
पर्सनल लोन इन्शुरन्स हा एक प्रकारचा विमा आहे, जो पर्सनल लोन घेणाऱ्या व्यक्तीला अधिकची आर्थिक सुरक्षा प्रदान करतो. त्याला कर्ज संरक्षण विमा असेही म्हणतात. या विम्यात कर्जाची परतफेड समाविष्ट आहे. विशेषतः जेव्हा कर्जदार काही कारणास्तव कर्जाचा ईएमआय परत करू शकत नाही, तेव्हा या विम्याचा दावा करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या विमा कंपनीशी संपर्क साधावा लागेल. तुम्ही ईएमआय का भरू शकत नाही, हे तुम्हाला विमा कंपनीला सांगावे लागेल.
हेही वाचा - कर्जाचा सापळा : क्रेडिट कार्डवरून पैशांची प्रचंड उधळपट्टी; वर्षभरात थकित रक्कम 28 टक्क्यांनी वाढून 6,742 कोटींवर
पर्सनल लोन इन्शुरन्सचे प्रमुख फीचर्स आणि कव्हरेज
जीवन विमा : कर्जदाराच्या मृत्यूच्या बाबतीत थकीत कर्ज फेडून हा विमा तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक जबाबदाऱ्या कमी करतो.
अपंगत्व विमा: एखाद्या अपघातामुळे किंवा आजारामुळे कर्जदार काम करू शकत नसेल, तर इन्शुरन्स त्या कालावधीसाठी कर्ज घेतलेली रक्कम परत करेल.
बेरोजगारी कव्हरेज: कर्जदाराची नोकरी गेली तर पॉलिसीद्वारे त्याला नवीन नोकरी मिळेपर्यंत विशिष्ट कालावधीसाठी कर्ज फेडले जाऊ शकते.
पर्सनल लोन इन्शुरन्सचे फायदे
आर्थिक सुरक्षा: हे कर्जदारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना भविष्यातील अडचणींपासून संरक्षण देते. भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात अशा परिस्थिती उद्भवू शकतात.
क्रेडिट स्कोअरवर कोणताही परिणाम होत नाही: हे कर्जदारांना उशिरा पेमेंट केल्यामुळे त्यांच्या क्रेडिट स्कोअरवर होणाऱ्या परिणामापासून संरक्षण देते.
हेही वाचा - Buy or Rent House : स्वतःचं घर असावं, ही प्रत्येकाची इच्छा; पण भाड्याने रहावं की खरेदी करावं? काय फायद्याचं?
देशात पर्सनल लोन घेणाऱ्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. परंतु, पर्सनल लोन इन्शुरन्सविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. पर्सनल लोन इन्शुरन्समुळे कर्ज घेणारी व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांना अधिकची सुरक्षितता मिळते. ते अधिक आत्मविश्वासाने त्यांच्या पैशांचे व्यवस्थापन करू शकतात.
(Disclaimer : कर्ज, गुंतवणूक या जोखमीच्या बाबी आहेत. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. तज्ज्ञांचा सल्ला घ्या)