Wednesday, August 20, 2025 05:06:50 AM

धारावीमध्ये गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग; सलग स्फोटांमुळे खळबळ

धारावी बस डेपोसमोर सिलेंडरचा ट्रक जळून खाक; पोलिसांकडून तपास सुरू

धारावीमध्ये गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग सलग स्फोटांमुळे खळबळ


मुंबई, धारावी : सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास धारावी परिसरात एक मोठी दुर्घटना घडली. गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली आणि त्यानंतर एकामागून एक स्फोट होत गेले. आगीच्या ज्वालांनी संपूर्ण परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना धारावी बस डेपोसमोर घडली. अचानक झालेल्या मोठ्या स्फोटामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस आणि आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल १५ गाड्या घटनास्थळी कार्यरत होत्या.

एकामागून एक सिलेंडर स्फोट; परिसर हादरला
गॅस सिलेंडर ट्रकला लागलेल्या आगीमुळे ट्रकमध्ये ठेवलेल्या सिलेंडरचा एकामागून एक स्फोट होत गेला. यामुळे परिसरातील नागरिकांची झोप उडाली. स्फोटाचा आवाज काही किलोमीटर दूरपर्यंत ऐकू येत होता. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिसरातील रस्ते तातडीने बंद करण्यात आले.

👉👉 हे देखील वाचा : प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक

सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. मात्र, या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. तसेच आजूबाजूला पार्क केलेल्या काही दुचाकीही जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

धारावीतील पीएमजीपी कॉलनी परिसरात ही घटना घडल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांकडून नागरिकांना घटनास्थळी जाण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून, आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

घटनास्थळी तातडीने पोहोचलेल्या आमदार ज्योती गायकवाड यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. "घटनास्थळी गर्दी करू नका, अग्निशमन दल आपल्या जबाबदारीने काम करत आहे," असे त्यांनी सांगितले. तसेच, खासदार वर्षा गायकवाड यांनी या मार्गावरील वाहतुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

या दुर्घटनेनंतर या ट्रकमधील सिलेंडर अनधिकृतपणे वाहतूक होत होते का, तसेच ट्रक तिथे कसा उभा होता, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे धारावीत मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली असून, प्रशासनाकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
 


सम्बन्धित सामग्री