कोल्हापूर: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील विकासकामांमध्ये अडथळा येत असल्याचा आरोप होत आहे. इतकच नाही, तर काही पुरुषांनी बहीण योजनेतील पैशांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अशातच, आता हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हसन मुश्रीफ म्हणाले की, 'जर मी राज्याचा मुख्यमंत्री झालो, तर मी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाखांचं अनुदान देईल'.
हेही वाचा: ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर सायंकाळी आदित्य आणि अमित ठाकरे येणार एकाच मंचावर
काय म्हणाले हसन मुश्रीफ?
कागलच्या वंदूर येथे झालेल्या कार्यक्रमात हसन मुश्रीफ म्हणाले की, 'कर्जमाफीची शक्यता असल्यास, शेतकरी कर्ज फेडत नाहीत. ज्याचा परिणाम बँकांवर होतो. बँकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. सुदैवाने, अशी परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यात नाही. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या 90% परतफेड केली होती. यावर्षी हा आकडा एक टक्क्याने वाढून 91% झाला आहे'.
पुढे, हसन मुश्रीफ म्हणाले की, 'प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या कर्जमाफी आंदोलनामुळे पतसंस्थांचे 38,000 कोटी रुपये थकले आहेत असे मी ऐकले आहे. म्हणूनच, मी प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. जर मला तुम्ही संधी दिली तर मी मुख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 1 लाखांचं अनुदान देईल'. यासह, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, 'बांधकाम कामगारांसाठी असणारे भांड्यांचे किट तालुक्यात सर्वाधिक आले मात्र मतं मिळाली नाहीत. आता झालं गेलं गंगेला मिळालं, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकसंघ काम करा'.