सरोज अहिरे विरुद्ध विजय करंजकर; भगूर पाणीपुरवठा योजनेसाठी श्रेयवादाने महायुतीत तणावकिरण गोटूर नाशिक प्रतिनिधी : नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील भगूर पाणीपुरवठा योजनेवरून पुन्हा एकदा महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. या मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी भगूर पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केल्यानंतर शिवसेनेचे उपनेते आणि संपर्कप्रमुख विजय करंजकर यांनी ही योजना भगूर नगरपरिषदेच्या अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केल्याचे सांगत पलटवार केला. या पाणीपुरवठा योजनेच्या श्रेयवादावरून सुरू झालेल्या या लढाईमुळे महायुतीतीलच नेत्यांचे वाद विकोपाला गेलेत का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात उमेदवारी वाटपापासून सुरू झालेला महायुतीतील शिंदे यांचे शिवसेना विरुद्ध अजित पवारांचे राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष निवडणुकीनंतरही थांबायचं नाव घेत नाहीये. या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेने राजश्री अहिरराव यांना उमेदवारी देत राष्ट्रवादीच्या उमेदवार सरोज अहिरे यांच्यासमोर महायुतीतूनच आव्हान उभे केले होते. मात्र या सगळ्यावर मात करत सरोज अहिरे यांनी या निवडणुकीत विजय मिळवला. मात्र हा वाद केवळ निवडणुकीपुरताच होता असे नाही, तर हा महायुतीतला वाद आजही पाहायला मिळतोय. हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला तो भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून. भगूर नगर परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची सत्ता आहे. त्यांनी ही पाणीपुरवठ्याची योजना आपल्या पाठपुराव्याने मंजूर झालेली असताना या कामाचे श्रेय विद्यमान आमदार घेत असल्याचा आरोप केला.
विजय करंजकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "ही योजना भगूर नगरपरिषदेच्या विकासासाठी महत्त्वाची आहे आणि ती मंजूर करण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न केले. मात्र, आता आमदार सरोज अहिरे या योजनेचे श्रेय घेत आहेत, हे खपवून घेतले जाणार नाही."
दुसरीकडे, ही योजना आपल्या पाठपुराव्यामुळे झाल्याचे सांगत शिंदेंच्या शिवसेनेने या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त झालेल्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. कार्यक्रमात सरोज अहिरे यांनी अजित पवार यांच्या समोरच तक्रारींचा पाढा वाचला. भगूर नगर परिषदेतील पाणीपुरवठ्याच्या योजनेचे काम आपण कशाप्रकारे मंजूर केले, सभागृहात या संदर्भात कशा पद्धतीने आवाज उठवला, याचे व्हिडिओज त्यांनी अजित पवार यांच्यासमोर लावून दाखवले. इतकच नाही, तर अजित पवारांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे अशी विनंती सरोज अहिरे यांनी केली. निवडणुकीतही आपल्याला त्रास दिला गेला, कार्यक्रमाला लोकांनी येऊ नये म्हणून रस्त्यात गुंड उभे केले, इथपर्यंतचे गंभीर आरोप सरोज अहिरे यांनी जाहीर सभेत केले.
अजित पवारांचा हस्तक्षेप; सरोज अहिरे यांना पाठींबा, देवळालीतील वाद चिघळण्याची शक्यता
यावर अजित पवार यांनीही या विषयावर भाष्य करताना, "सरोज अहिरे यांनी ही योजना मंजूर करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यांना कोणाचाही त्रास सहन करावा लागणार नाही. आम्ही त्यांच्यासोबत आहोत," असे सांगितले. तसेच, अशा वादांकडे लक्ष न देता मतदारसंघाच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू झालेला हा वाद अद्यापही कायम आहे. पुन्हा एकदा या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करणार असल्याचे शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात देवळाली मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेला हा संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे.