छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्याच्या प्रयत्नाला विरोध, गावकरी एकवटले
श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथे गावकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नूतनीकरण करून पुनर्स्थापित केला. मात्र, प्रशासन आणि पोलिसांनी हा पुतळा हटवण्याचा घाट घातला आहे. यामुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली असून गावकरी एकवटले आहेत.
गावकऱ्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला असून, या आंदोलनाला अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप आणि श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनीही पाठींबा दिला आहे. त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून महाआरती केली. यावेळी आमदार जगताप यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेत, "छत्रपतींच्या महाराष्ट्रात त्यांच्या पुतळ्याचे विस्थापन हा जिहादी मानसिकतेचा विचार असून, कोणत्याही परिस्थितीत हा पुतळा हटवू देणार नाही," असा इशारा दिला.
शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप असून, गावकऱ्यांनी छत्रपतींच्या पुतळ्यासाठी रात्रंदिवस पहारा देण्याचा निर्णय घेतला आहे. "छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे आदर्श आहेत. त्यांच्या पुतळ्याचा अवमान सहन केला जाणार नाही," असे सागर बेग यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणावर प्रशासनाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, गावकऱ्यांचा विरोध पाहता पुढील काही तासांत या विषयावर महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.