वर्ल्ड कप 2027 आधी टीम इंडियाचे 9 वनडे दौरे, संपूर्ण वेळापत्रक बघा एका क्लिकवर
टीम इंडियानं नुकतीचं ICC Champions Trophy 2025 जिंकली आणि क्रिकेट ODI जगतामध्ये आपला दबदबा दंड थोपटून सांगितला. आता संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष्य पुढील वनडे वर्ल्ड कप 2027 कडं लागलं आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे खेळवली जाणार आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला तब्बल 9 वनडे मालिका खेळायच्या आहेत. ज्यामध्ये 3-3 सामन्यांच्या मालिकांचा समावेश आहे. याचा अर्थ, टीम इंडिया वर्ल्ड कपपूर्वी एकूण 27 वनडे सामने खेळणार आहे.
भारतीय संघ आगामी काळात बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूजीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांसारख्या ताकदवान संघांविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहेत. भारतीय संघाचं शेड्यूल कसं आहे. हे आपण पाहुयात...
ऑगस्ट 2025 – बांगलादेश दौरा
भारतीय संघ बांगलादेशमध्ये 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. बांगलादेश नेहमीच आपल्या घरच्या मैदानावर बलाढ्य संघ ठरला आहे. त्यामुळे ही मालिका रंगतदार होऊ शकते.
ऑक्टोबर – नोव्हेंबर 2025 – ऑस्ट्रेलिया दौरा
बांगलादेश दौऱ्यानंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचा मोठा दौरा करायचा आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका नेहमीच रोमांचक होतात. यावेळीही भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करणं मोठं आव्हान असणार आहे.
हेही वाचा - IPL 2025: राजस्थान रॉयल्सचे हेड कोच राहुल द्रविड कुबड्यांच्या आधाराने पोहोचले संघाच्या कॅम्पमध्ये, पाहा VIDEO
नोव्हेंबर – डिसेंबर 2025 – दक्षिण आफ्रिका (भारतात मालिका)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारत आपल्या घरी दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळणार असला तरी आफ्रिकेचा संघ हा भारतासाठी तगडा प्रतिस्पर्धी राहिला आहे.
जानेवारी 2026 – न्यूजीलंड (भारतात मालिका)
नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर वनडे मालिका खेळेल. न्यूझीलंड संघाने गेल्या काही वर्षांत भारतासमोर चांगली लढत दिली आहे. त्यामुळे ही मालिका अत्यंत रोमहर्षक ठरणार आहे.
हेही वाचा - चॅम्पियन्स ट्रॉफीत महत्वपूर्ण कामगिरी करूनही हार्दिक पांड्याला फटका
जून 2026 – अफगाणिस्तान (भारतात मालिका)
न्यूझीलंड मालिकेनंतर भारताला घरच्या मैदानावर अफगाणिस्तान विरुद्ध लढत द्यावी लागणार आहे. अफगाण संघात उत्कृष्ट फिरकीपटू आहेत. जे भारतीय फलंदाजांसाठी मोठे आव्हान ठरू शकतात.
जुलै 2026 – इंग्लंड दौरा
भारताचा पुढील मोठा दौरा जुलै 2026 मध्ये इंग्लंडमध्ये होणार आहे. तिथल्या गवताळ खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांची खरी कसोटी लागणार आहे. इंग्लंडचा संघ घरच्या मैदानावर अत्यंत ताकदवान असल्याने ही मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे.
सप्टेंबर – ऑक्टोबर 2026 – वेस्ट इंडीज (भारतात मालिका)
भारतीय संघ वेस्ट इंडीज विरुद्ध घरच्या मैदानावर वनडे मालिका खेळेल. वेस्ट इंडीज संघ पावर हिटिंगसाठी ओळखला जातो. त्यामुळे भारतीय गोलंदाजांसमोर मोठे आव्हान असणार आहे.
ऑक्टोबर – नोव्हेंबर 2026 – न्यूजीलंड (भारतात मालिका)
भारतीय संघ वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा न्यूजीलंड संघाचा सामना करणार आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका वर्ल्ड कपपूर्वीची शेवटच्या फेजची तयारी असणार आहे.
डिसेंबर 2026 – श्रीलंका (भारतात मालिका)
टीम इंडियाचा शेवटचा वनडे सामना श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर खेळला जाणार आहे. भारत-श्रीलंका लढती नेहमीच रंगतदार झाल्या आहेत. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजीचा सामना करणे ही भारतीय फलंदाजांसाठी अंतिम चाचणी ठरणार आहे.