नवी दिल्ली: ऑनलाइन फसवणुकीविरुद्ध आणि घोटाळ्यांपासून वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी व्हॉट्सअॅपने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. प्लॅटफॉर्मवरून तब्बल 68 लाख बनावट अकाउंट्स हटवण्यात आले आहेत. बहुतेक खाती आग्नेय आशियातील गुन्हेगारी घोटाळ्यांच्या नेटवर्कशी जोडलेली होती. या खात्यांद्वारे लोकांना नोकरी, गुंतवणूक संधी, आणि खोट्या बक्षिसांचे आमिष दाखवून वैयक्तिक तसेच आर्थिक माहिती चोरण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. मेटाच्या मते, घोटाळेबाज सायबर फसवणूकीसाठी व्हॉट्सअॅप, एसएमएस, चॅटजीपीटी, टिकटॉक, टेलिग्राम आणि क्रिप्टोकरन्सी आदी प्लॅटफॉर्म्सचा वापर करतात.
व्हॉट्सअॅपची नवी सुरक्षा वैशिष्ट्ये -
व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटा वापरकर्त्यांना घोटाळ्यांपासून वाचवण्यासाठी नवी सुरक्षा फीचर्स आणत आहे. यात खालील वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
ग्रुप अलर्ट: जर एखादा अनोळखी व्यक्ती तुम्हाला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडतो, तर एक अलर्ट मिळेल ज्यामध्ये ग्रुपची माहिती आणि सुरक्षा टिप्स असतील. संशयास्पद ग्रुप असल्यास तुम्ही सहज बाहेर पडू शकता.
अज्ञात नंबरसह चॅटवर इशारा: अज्ञात नंबरवरून मेसेज आल्यास उत्तर देण्यापूर्वी इशारा दिला जाईल, ज्यामुळे तुम्ही निर्णय घेण्याआधी विचार करू शकता.
हेही वाचा - भारताचा तडाखा! आता चिनी सॅटेलाईट वापरणार नाही.. Zee आणि JioStar यांना वेगळे पर्याय शोधावे लागतील
सायबर फसवणूक करण्याच्या पद्धती -
बनावट नोकरीच्या ऑफर: स्कॅमर मोठ्या कंपन्यांचे रिक्रूटर असल्याचा दावा करून जास्त पगाराच्या नोकऱ्या देतात. नंतर प्रशिक्षण किंवा इतर कारणाने पैसे मागतात किंवा बँक तपशील चोरतात.
खोटे बक्षीस: सायबर फसवणूकीची आणखी एक सामान्य पद्धत म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला बक्षीस किंवा लॉटरी जिंकल्याचा संदेश मिळतो. या संदेशात एक लिंक असते, ज्यावर क्लिक केल्यावर तुम्ही एका धोकादायक वेबसाइटवर पोहोचता, जी तुमचा डेटा चोरू शकते.
हेही वाचा - Iphone Alert: अॅपल डिव्हाइसेस वापरताय? मग 'हा' अलर्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा
सायबर फसवणूक कशी टाळावी?
सायबर फसवणूक टाळण्यासाठी मेटाने वापरकर्त्यांना 'पॉज, प्रश्न आणि पडताळणी' या नियमाचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. यानुसार, अज्ञात नंबरवरून आकर्षक ऑफर आल्यास प्रतिसाद देण्याची घाई करू नका. स्वतःला विचारा की ही ऑफर खरी असण्याइतकी चांगली नाही का? कोणीतरी तुमच्यावर जलद निर्णय घेण्यासाठी दबाव आणत आहे का किंवा पैसे मागत आहे का? किंवा ही सर्व घोटाळ्याची चिन्हे आहेत का? तसेच संदेश पाठवणाऱ्याची ओळख विश्वासार्ह माध्यमातून पडताळा. सावध राहून, विचारपूर्वक प्रतिसाद देऊन आणि माहितीची खात्री करूनच तुम्ही व्हॉट्सअॅपवरील फसवणुकीपासून स्वतःचे आणि तुमच्या पैशाचे संरक्षण करू शकता.