Terror Funding : दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) ने पाकिस्तानमध्ये आपल्या कारवाया वाढवण्यासाठी गुप्तपणे मोठ्या निधी संकलन मोहिमेचा कट रचला होता. गुप्तचर सूत्रांनुसार, संघटनेचे उद्दिष्ट पाकिस्तानमध्ये 3.91 अब्ज रुपये उभारून 313 नवीन मरकझ (प्रशिक्षण शिबिरे आणि सुरक्षित आश्रयस्थाने) उभारणे होते.
जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर आणि त्याचा भाऊ तल्हा अल सैफ यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले आणि समर्थकांना उदार हस्ते देणगी देण्याचे आवाहन केले. यासाठी, इझीपैसा आणि सदापे सारख्या डिजिटल वॉलेटचा वापर करण्यात आला. जेणेकरून व्यवहारांना FATF (Financial Action Task Force) च्या तपासणीपासून वाचवता येईल.
पाकिस्तानचा जगाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आटापिटा
यात पाकिस्तानी सरकारची बँक खाती नसल्यामुळे पाकिस्तान असा खोटा दावा करू शकतो की, ते दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत नाहीत. यापूर्वी दहशतवादी कारवायांना पैसा पुरवल्यामुळे पाकिस्तानला FATF ने ग्रे लिस्टमध्ये टाकले होते. मात्र, या लिस्टमधून 2022 मध्ये पाकिस्तान अधिकृपणे बाहेर पडला होता. यासाठी पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे अनेक पुरावे सादर केले होते.
हेही वाचा - 'ट्रम्प सकाळी मोदींशी हात मिळवतात, मग रात्री पाठीत सुरा खुपसतात..', Trump Tariff वरून अमेरिकन अर्थशास्त्रज्ञाची जोरदार टीका
मसूद अझहरच्या कुटुंबाशी संबंधित खात्यांमध्ये पैसा जमा होतोय
तपासात असे आढळून आले की, हे डिजिटल वॉलेट मसूद अझहरच्या कुटुंबाशी संबंधित मोबाईल नंबरवर नोंदणीकृत होते, ज्यामध्ये त्याचा भाऊ तलहा अल सैफ आणि मुलगा अब्दुल्ला अझहर यांचे नंबर देखील समाविष्ट होते. याशिवाय, दर शुक्रवारी पाकिस्तानातील मशिदींमध्ये गाझा येथील लोकांसाठी देणग्या म्हणून रोख रक्कम गोळा केली जात होती. प्रत्यक्षात हे पैसे जैशच्या दहशतवादी कारवायांसाठी वापरले जात होते.
दरम्यान, जैशशी जोडलेली अल रहमत ट्रस्ट ही संघटना बहावलपूरमधील बँक खात्याद्वारे निधी गोळा करत होती. हा ट्रस्ट स्वतः मसूद अझहर आणि त्याचे जवळचे सहकारी चालवतात.
दहशतवाद्यांची भरती आणि प्रशिक्षणासाठी नव्याने मरकझ उभारणे सुरू
ही निधी संकलन मोहीम पुढे सरकत असताना, जैशच्या नेत्यांनी खुलासा केला की, नवीन बांधलेले मरकझ मसूद अझहर आणि त्याच्या कुटुंबासाठी एक सुरक्षित आश्रयस्थान ठरेल; जेणेकरून ते त्यांची उपस्थिती लपवू शकतील. या ठिकाणांचा वापर नवीन दहशतवाद्यांच्या भरती आणि प्रशिक्षणासाठी देखील केला जाणार होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, ही निधी संकलन मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली आणि जैशने पाकिस्तान आणि परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले. या पैशातून संघटनेने मशीन गन, रॉकेट लाँचर आणि मोर्टारसारखी आधुनिक शस्त्रे खरेदी केली.
आता त्यांच्या नवीन शस्त्रास्त्रांसह आणि विस्तारित रचनेसह, जैश-ए-मोहम्मद एक नवीन दहशतवादी लाट सुरू करण्याची तयारी करत आहे. संघटनेच्या नेत्यांना खात्री आहे की, त्यांच्या अत्याधुनिक निधी प्रणाली आणि गुप्त संपर्क माध्यमांमुळे त्यांच्या कारवाया दीर्घकाळ लपून राहतील. हा भारतासाठी मोठा धोका आहे, यात शंका नाही.
ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवाद्यांचे मोठे नुकसान; पण आता धोका पुन्हा बळावतोय
यापूर्वी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. भारतीय सशस्त्र दलांनी 7 मे रोजी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले आणि 10 मेपर्यंत सीमावर्ती भागात तीव्र चकमकी सुरू राहिल्या, त्यानंतर दोन्ही देशांनी शत्रुत्व संपवण्याचा करार केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय 'मरकझ सुभानल्लाह', मरकझ बिलाल, मरकझ अब्बास, महमोना जोया आणि सरगल प्रशिक्षण शिबिर या चार इतर प्रशिक्षण शिबिरांसह ते उद्ध्वस्त झाले. आता या दहशतवादी तळांसह आणखी नवे तळ बांधण्याचे काम जोमाने सुरू झाले आहे.
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय काळ्या बाजारातून स्वस्त दरात शस्त्रे खरेदी करण्यास जेईएमला मदत करते हे सर्वज्ञात आहे. आता पाकिस्तान दहशतवादी आणि त्यांच्या तळांना शस्त्रास्त्रांनी अधिक सुसज्ज आणि अत्याधिनुक बनवण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. आता या सर्व परिस्थितीवर FATF आणि भारत कोणती कारवाई करेल, ही बाब पुढील काळात महत्त्वाची ठरणार आहे.
हेही वाचा - Air Defence Weapon System: आता शत्रूलाही धडकी भरणार! एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची पहिली चाचणी यशस्वी