आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठा तणाव निर्माण झाला असून इराणच्या सीमेवर सुमारे 50,000 अमेरिकन सैनिक तैनात असल्याचा दावा इराणने केला आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या संदर्भात इशारा दिला आहे की, 'अमेरिकन सैन्य काचेच्या घरात आहे आणि त्यांनी इराणविरोधात कोणतेही आक्रमक पाऊल उचलू नये.'
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट धमकी दिली आहे की, जर त्यांनी अणुकार्यक्रमाबाबत अमेरिकेशी करार केला नाही, तर बॉम्बस्फोट होतील. तसेच, इराणवर अधिक आर्थिक निर्बंध लादले जातील, असेही त्यांनी नमूद केले. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघई यांनी ट्रम्प यांच्या धमकीला तीव्र विरोध दर्शवला आहे. 'एका देशाच्या राष्ट्राध्यक्षाने दुसऱ्या देशावर उघड बॉम्बहल्ल्याची धमकी देणे हे जागतिक शांततेसाठी लज्जास्पद आहे,' असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: उत्तराखंडच्या पुष्कर सिंह धामी सरकारचा राज्यातील 15 ठिकाणांची नवे बदलण्याचा निर्णय
तेहरान टाईम्सच्या अहवालानुसार, इराणच्या भूमिगत तळांमध्ये मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत आणि ते युद्धासाठी पूर्णपणे तयार आहेत. इराणने अमेरिका आणि त्यांच्या साथीदारांविरोधात कठोर भूमिका घेतली असून, थेट वाटाघाटींस नकार दिला आहे, मात्र अप्रत्यक्ष चर्चा सुरू ठेवण्याची शक्यता व्यक्त केली आहे.