Arun Gawli : शिवसेना नगरसेवक हत्येप्रकरणी अरुण गवळीला दिलासा; तब्बल 18 वर्षांनंतर जामीन मंजूर
मुंबई : कुख्यात गुंड अरुण गवळी ऊर्फ डॅडी याला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी अखेर जामीन मंजूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कमलाकर जामसांडेकर यांच्या 2007 मधील हत्या प्रकरणात त्याला जामीन मंजूर केला आहे. यामुळे तब्बल 18 वर्षांनी त्याची जामिनावर सुटका होणार आहे. अरुण गवळी यांना त्याच्या साथीदारांसह 2006 साली अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2007 साली शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने ऑगस्ट 2012 मध्ये गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच त्याच्यावर 17 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. या निर्णयाला गवळीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, 9 डिसेंबर 2019 रोजी उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाची शिक्षा कायम ठेवली. यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. गवळीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, त्याच्यावरील कारवाई नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाशी विसंगत आणि अन्यायकारक आहे. तसेच, त्याच्यावर मोका कायद्याअंतर्गत केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचेही त्यांनी म्हटले. सरकारी वकिलांनी जोरदार विरोध केला, परंतु दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती सुंद्रेश यांच्या खंडपीठाने अरुण गवळीला सशर्त जामीन मंजूर केला.
दरम्यान, याप्रकरणी अंतिम सुनावणी फेब्रुवारी 2026 मध्ये निश्चित करण्यात आली आहे. गवळीला ट्रायल कोर्टाने घालून दिलेल्या अटी-शर्तींवर आधारित जामीन देण्यात आला आहे. मुंबईतील गुन्हेगारी विश्वात अरुण गवळी हे नाव नवं नाही. गवळीनं गुन्हेगारीतून पुढे राजकारणात प्रवेश केला. त्याने अखिल भारतीय सेना नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. 2004 ते 2009 या काळात तो चिंचपोकळी मतदारसंघाचा आमदारही होता.