Delhi CM Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर जनसुनावणीदरम्यान हल्ला; राजकीय वर्तुळातून निषेध व्यक्त
नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर सिव्हिल लाईन्स येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जनसुनावणीदरम्यान हल्ला करण्यात आला, असे वृत्त पीटीआयने गुरुवारी दिले. दिल्ली भाजपचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पक्षाच्या सूत्रांचा हवाला देत, अहवालात असेही म्हटले आहे की, रेखा गुप्ता यांच्यावर सुमारे ३५ वर्षांच्या एका व्यक्तीने हल्ला केला होता. त्यांनी प्रथम मुख्यमंत्र्यांना जनसुनावणीदरम्यान काही कागदपत्रे दिली आणि नंतर त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून घटनेची अधिक चौकशी सुरू आहे.
हल्ल्यावर भाष्य करताना दिल्ली काँग्रेसचे प्रमुख देवेंद्र यादव म्हणाले की, "हे खूप दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री संपूर्ण दिल्लीचे नेतृत्व करतात आणि मला वाटते की अशा घटनांचा जितका निषेध केला जाईल तितका तो कमीच आहे. परंतु ही घटना महिलांच्या सुरक्षिततेचीही पोलखोल करते. जर दिल्लीचे मुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सामान्य माणूस किंवा सामान्य महिला कशी सुरक्षित राहू शकेल?", दिल्लीतील विरोधी पक्षनेत्या आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी एक्स पोस्टचा वापर केला. त्यांनी लिहिले की, "दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाहीमध्ये मतभेद आणि निषेधाला स्थान असते, परंतु हिंसाचाराला स्थान नसते. दिल्ली पोलीस दोषींवर कठोर कारवाई करतील, अशी आशा आहे. मुख्यमंत्री पूर्णपणे सुरक्षित असतील, अशी आशा आहे."