Ganesh Visarjan 2025 : सहकार्य करा! अनंत चतुर्दशीनिमित्त महापालिकेचं गणेशभक्तांना आवाहन; वाचा सविस्तर माहिती
मुंबई : गणरायाच्या सानिध्यात दहा दिवस घालवल्यानंतर अकराव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या जड अंतकरणाने निरोप देतात. येत्या शनिवारी, 6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशीला घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळातील गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेश मंडळ असून धुमधडाक्यात मिरवणूक काढत भाविक गणरायांला निरोप देतात. यानिमित्ताने मुंबईतील सर्व विसर्जनस्थळी नागरिकांनी पावित्र्य व मांगल्य जपावे. उत्सवादरम्यान गर्दीच्या तसेच विसर्जनस्थळी जबाबदारीने आणि सतर्कतेने वागावे. मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस दल तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुंबईकरांना मुंबई महानगरपालिने केले आहे.
अनंत चतुर्दशीदिनासाठी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज झाली असून त्यांनी मुंबईतील घरगुती तसेच सार्वजनिक श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन सुलभ, निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी मागील दोन महिन्यांपासून पूर्वतयारी सुरू केली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनासंबंधित पूर्वतयारीबाबत उप आयुक्त (परिमंडळ-2) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी सांगितले की, मुंबईतील श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेकडून यंदाही अधिकाधिक विविध सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
महापालिकेची यंत्रणा सज्ज
गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी महापालिकेचे जवळपास दहा हजार अधिकारी–कर्मचारी, 245 नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत. यंदा श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी 70 नैसर्गिक स्थळांसह सुमारे 290 कृत्रिम विसर्जनस्थळांवर व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकाधिक भाविक तसेच सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांनी महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये श्रीगणेश मूर्ती विसर्जन करण्यास प्राधान्य द्यावे, असे महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारे वाहन चौपाटीवरील वाळूमध्ये अडकू नये व मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, यासाठी विविध ठिकाणच्या चौपाटीच्या किनाऱ्यांवर 1 हजार 175 स्टील प्लेट तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी 66 जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 2 हजार 178 जीवरक्षकांसह 56 मोटरबोटी तैनात केल्या आहेत. तसेच निर्माल्य संकलित करण्यासाठी 594 निर्माल्य कलशांसह 307 निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
महापालिकेच्या विविध खात्यातील कर्मचाऱ्यांमध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर 245 नियंत्रण कक्ष आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने 129 निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. विसर्जनस्थळावर 42 क्रेनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. विविध ठिकाणी 287 स्वागत कक्ष तयार करण्यात आले आहेत.
विसर्जनस्थळी येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य विभागाकडून 236 प्रथमोपचार केंद्रांसह 115 रुग्णवाहिका देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. विसर्जनस्थळी प्रकाश योजनेसाठी सुमारे 6 हजार 188 प्रकाश झोत दिवे आणि शोधकार्यासाठी 138 दिवे लावले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी 197 तात्पुरती शौचालये उपलब्ध करुन दिली आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहीत प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत.