Constitution Club Polls : अमित शाहांच्या उमेदवाराचा पराभव तर, एकनाथ शिंदेंचा उमेदवार विजयी; प्रतिष्ठेच्या निवडणुकीची चर्चा
नवी दिल्ली : कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) च्या सचिव (प्रशासन) या महत्त्वाच्या पदासाठी झालेल्या हाय-व्होल्टेज निवडणुकीत, भाजपचे ज्येष्ठ खासदार राजीव प्रताप सिंग रुडी पुन्हा एकदा विजयी झाले, त्यांनी त्यांच्या पक्षाचे सहकारी आणि माजी खासदार संजीव बालियान यांचा सुमारे 100 मतांनी पराभव केला. रुडी हे सलग चौथ्यांदा क्लबच्या सचिवपदी निवडून आले. मंगळवारी झालेल्या या हाय-प्रोफाइल निवडणुकीसाठी मतदान झाले. परंतु त्याची मतमोजणी रात्रभर सुरू राहिली, बुधवारी पहाटे 4 वाजता रुडी यांनी माध्यमांना त्यांच्या विजयाची माहिती दिली. राजीव प्रताप रुडी यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भाजपनं यंदा माजी खासदार संजीव बालियान यांना मैदानात उतरवलं होतं. त्यांच्या समर्थनार्थ खासदार निशिकांत दुबे उतरले होते. बालियान हे केंद्रीय मंत्री अमित शहांचे उमेदवार मानले जात होते.
राजपूत, जाट समाजाच्या खासदारांनी रुडी आणि त्यांच्या पॅनलसाठी मतदान केले. विरोधीपक्षातील खासदारांची मतं मिळवण्यासाठी रुडी यांनी त्यांच्या अनेक खासदारांना तिकिटं दिली. याशिवाय भाजपसह त्यांच्या मित्रपक्षांच्या खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्यामुळे भाजपसह एनडीएतील पक्षांच्या खासदारांची मतंही त्यांना मिळाली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे कार्यकारी सदस्यपदी निवडून आले. ते रुडी यांच्या पॅनेलचे उमेदवार होते. बालियान हे अमित शहांचे उमेदवार असल्यानं विरोधीपक्षाच्या खासदारांनी रुडी यांना भरभरुन मतदान केले.
एक सामान्य बाब मानली जाणारी राष्ट्रीय राजधानीच्या मध्यभागी असलेल्या खासदार आणि माजी खासदारांचा एक क्लब असलेल्या सीसीआयच्या व्यवस्थापनासाठी झालेल्या निवडणुका यावेळी चर्चेत होत्या. ज्यामध्ये दोन भाजप नेते, दोन्ही माजी केंद्रीय मंत्री, केंद्रस्थानी होते. कारण त्यांनी त्याच्या सर्वात शक्तिशाली पदासाठी जोरदार स्पर्धा केली. सीसीआयच्या निवडणुकीत राष्ट्रीय राजकारणातील कोणकोण मतदान करण्यासाठी क्लबच्या परिसरात उतरले होते, हे दिसून आले. या यादीत गृहमंत्री अमित शहा, भाजप प्रमुख जे.पी. नड्डा, पीयूष गोयल आणि किरेन रिजिजू, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांच्यासारखे काही राज्यपाल यांचा समावेश होता. सीसीआयच्या पात्र मतदारांची म्हणजेच खासदार किंवा माजी खासदारांची संख्या 1,295 होती. तर यावेळी 707 मते पडली. रुडी यांना 391 मते मिळाली तर बालियान यांना 291 मते मिळाली.