Air India lane : पक्षाची विमानाच्या इंजिनला धडक; 140 प्रवाशांनी भरलेल्या विमानाचं उड्डाण रद्द, पायलटनं घेतला हा निर्णय आणि...
पुणे विमानतळावर विमानाला पक्षी धडकल्यामुळे पुणे-भुवनेश्वर उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. विमानतळांवर वारंवार प्राणी आणि पक्षी यांच्या व्यत्ययाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याने विमान प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यातच आज पुणे विमानतळवरून भुवनेश्वरला उड्डाणाच्या तयारीत असलेले 1098 हे विमानही रद्द करावे लागले आहे. पक्षी धडकल्यामुळे विमानाच्या एका बाजूचे पाच ब्लेड निकामी झाले. हा प्रकार वेळीच पायलटच्या लक्षात आल्यामुळे विमान उड्डाण रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
पुण्याहून भुवनेश्वरकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-1098 विमानाला उड्डाणादरम्यान पक्षी धडकला. या विमानामध्ये 140 प्रवासी होते. धावपट्टीवर वेग घेत असताना उजव्या बाजूच्या इंजिनाला पक्षी आदळल्यामुळे विमानाचे पाच ब्लेड निकामी झाले. पायलटच्या सतर्कतेमुळे वेळेवर उड्डाण थांबवण्यात आले. परंतू उड्डाण रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
एअर इंडिया एक्सप्रेसचे IX-1098 हे विमान सायंकाळी 4.05 वाजता भुवनेश्वरकडे रवाना होणार होते. विमानात दीडशेपेक्षा अधिक प्रवासी होते. नियोजित वेळेनुसार विमान धावपट्टीवर गेले. उड्डाणासाठी वेग घेत असतानाच उजव्या इंजिनात पक्षी आदळला. पायलटच्या लक्षात येताचं त्यांनी त्वरीत उड्डाण थांबवले आणि विमान पुन्हा पार्किंग बेमध्ये आणले.