Pune News : पुण्यात तीन महापालिका?; अजित पवारांकडून घोषणा, मात्र मुख्यमंत्र्यांनी मांडलं वेगळ मत, म्हणाले...
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात तीन महापालिकांची गरज असल्याचे जाहीर केले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांचा हा दावा फेटाळून लावला. नव्याने केवळ एका महापालिकेची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासाठी नक्की एक महापालिका होणार की, तीन महापालिका होणार, हे चित्र अद्याप अस्पष्ट आहे.
महापालिकेच्या हद्दीत ३२ गावांचा समावेश झाल्यानंतर मुंबई महापालिकेपेक्षा पुणे महापालिकेची हद्द मोठी झाली. तेव्हापासून महापालिकेचे विभाजन करून नव्याने महापालिका निर्माण करण्याची मागणी होत आहे. पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेलगतचे नागरीकरण वाढल्याने तेथेही नव्याने आणखी एक महापालिका स्थापन केली जावी, असे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी चाकण परिसराची पाहणी केली. त्यावेळी पुण्यासाठी नव्याने तीन महापालिकांची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी नव्या तीन महापालिकांचा पवारांचा दावा खोडून काढला. सध्या पुणे जिल्ह्यात दोन महापालिका अस्तित्वात असून त्याशिवाय आणखी एक महापालिका गरजेची आहे, असे ते म्हणाले.