दिलासादायक! आता चार तासांचा प्रवास होणार सव्वा तासात; समृद्धी महामार्ग-वाढवण बंदराला जोडणाऱ्या रस्त्याला अखेर मंजुरी
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्ग यांना फ्रेट कॉरिडॉर या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने भरवीर (ता. चांदवड, जि. नाशिक) येथे जोडण्यात येणार असून या 104.898 किलोमीटरच्या महामार्गाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) माध्यमातून हाती घेण्यात आला असून, यासाठी ‘हुडको’कडून एक हजार 500 कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यात येणार आहे. या कर्जासह दोन हजार 528 कोटी 90 लाख रुपयांच्या तरतुदीसदेखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. वाढवण बंदराच्या माध्यमातून जलमार्गे होणारी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक देशातील सर्व भागापर्यंत वेगाने व परवडणाऱ्या दरात पोहोचण्याच्या दृष्टीने हे बंदर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडण्याचा हा प्रस्ताव आहे. या रस्त्याच्या कामामुळे चार तासांचा प्रवास सव्वा तासांवर येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Dadar Kabutar Khana Controversy: दादरमध्ये राडा, ताडपत्री फाडून थेट कबुतरखान्यात शिरले, जैन समाज आक्रमक हा महामार्ग पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातून जाणार आहे. वाढवण बंदर ते भरवीर हा प्रवास सद्याच्या 4-5 तासावरून साधारणतः 1 ते 1.5 तासावर येईल. यामुळे वाहतुकीच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. दळणवळण गतिमान झाल्याने पालघर, नाशिक जिल्ह्यांमधील लघु, मध्यम व अवजड उद्योग कारखाने, कृषी-विषयक संस्था, शिक्षणसंस्था, आयटी कंपन्या, कृषी उद्योग केंद्रांना याचा लाभ होणार आहे.