Farmers Get Funds : राज्यातील अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा; सरकारची जिल्हानिहाय आर्थिक मदतीची घोषणा
राज्यात अवकाळी पावसामुळे नेहमीच शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर 2024आणि यंदा जून 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून 368 कोटी 86 लाख 85 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीस मंजुरी दिली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी ही माहिती दिली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 14.54 कोटी, अमरावती विभागासाठी 86.23 कोटी आणि धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यातील नुकसानीसाठी 268.08 कोटी रुपयांचा समावेश आहे.
गेल्या वर्षातील अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील 3.27 लाख शेतकरी प्रभावित झाले असून, सर्वात मोठा निधी याच जिल्ह्याला मंजूर झाला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि धुळे जिल्ह्यांनाही यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या आपत्तीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. जिल्हा प्रशासनानेही तातडीने कारवाई करून अहवाल सादर केल्याने, सरकारने या मदतीस त्वरित मान्यता दिली.