Raj Thackeray : 'बेस्ट'च्या पराभवानंतर राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला; थेट कारणही सांगितलं
मुंबई : मुंबईत नुकतीच बेस्ट पतपेढीची निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला. काल या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आज, गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगल्यावर ही भेट झाली असून दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्याचे समजते. या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद देत भेटीबाबतचे कारण सांगितले. शहरातील विविध समस्या त्यांनी मुंख्यमंत्र्यांसमोर मांडल्या असून त्याचा पुनरोच्चार पत्रकार परिषदेत केला.
राज ठाकरे म्हणाले की, काही महत्त्वाच्या प्रश्नांसाठी आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी ॲस्थेटिक या विषयाबाबत आम्ही एक डॉक्युमेंटरी केली होती. शहर नियोजन हा माझा आवडीचा विषय आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरात आता पुनर्विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ज्याठिकाणी 50 माणसे राहत होती, आता तिथे 500 माणसे आली आहेत. त्यांच्या गाड्या वाढल्या. कचरा वाढला. हे सर्व आता रस्त्यावर येत असून त्यामुळे शहराचा बट्ट्याबोळ होत आहे.