ST Employees In Maharashtra : गणेशोत्सवापूर्वीच मिळणार एसटी कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याचा पगार?; परिवहनमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांकरता दिलासादायक बातमी समोर येत आहे. यंदा गणपती आगमनाआधीच कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याचे वेतन मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंबंधी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वेतन लवकर देण्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे यंदा एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार, असे संकेत दिसत आहेत. राज्य शासनाचे कर्मचाऱ्यांना गणपतीपूर्वी पगार देण्याचे आदेश असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळावा, यासाठी सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पगाराच्या फाईल वित्त मंत्रालयाकडे सादर करण्याचे आदेश परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.
अवघ्या काही दिवसांवर गणपती उत्सव आला आहे. या काळात कोकणात जाणाऱ्या एसटी बसेसच्या फेऱ्यांमध्येही वाढ होते. कोकणात गणेशोत्सवासाठी एसटीच्या जादा बसेस सोडल्या जातात. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो. दरम्यान, पुढील महिन्याचा पगार वेळेआधीच मिलाळा तर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल. शिवाय त्यांच्या कुटुंबियांनाही सण-उत्सव आनंदात साजरा करता येईल.