Heavy Rain Update : मुसळधार पावसानं मुंबईला झोडपलं! रेल्वेसेवा उशिरानं; तर रेल्वे ट्रॅकवर पाणी, दुपारच्या सत्रातील शाळांना सुटी जाहीर
मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरसह राज्यातील विविध भागांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई क्षेत्रात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईतील दुसऱ्या सत्रातील म्हणजेच दुपारी 12 वाजेनंतर भरणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सोमवार, 18 ऑगस्ट 2025 रोजी सुटी जाहीर केली आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच नागरिकांच्या मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी महापालिकेने मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
पावसाचा सर्वाधिक परिणाम रेल्वे वाहतूक सेवेवर झाला असून मध्य व हार्बर रेल्वे मार्ग धिम्या गतीने सुरू आहे. या दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने चालत असून त्यामुळे कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडलेले मुंबईकर स्थानकावरच अडकून पडले आहेत. ठाणे ते पनवेल, वाशी रेल्वे वाहतूक उशिराने सुरू असून कुर्ला स्थानकाच्या ट्रॅकवर पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील 48 तासांसाठी मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला असून ठाण्यात देखील रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच पुढील 48 तास मुंबईसह कोकणात धुंवाधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचे समजते. राज्यातील पूरग्रस्त भागाचा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद सुरू रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांना हवामान विभागानं पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.