यंदाचा दहीहंडी उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी मुंबई

Dahi Handi 2025 : दहीहंडी उत्सवासाठी यंत्रणा सज्ज; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, अशी असेल सुरक्षा व्यवस्था

मुंबई : मुंबई शहरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. ठिकठिकाणी दहीहंडी मंडळांकडून स्पर्धा आयोजित केल्या जातात. यंदाचा उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी मुंबई शहरातील विविध यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. यंदाच्या दहीहंडी उत्सवावर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून कोणतीही अनुचित घटना किंवा गुन्ह्याचे गालबोट लागू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, या उद्देशाने शहरात जागोजागी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

दहीहंडी फोडण्यासाठी रचण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांचा थरार सर्वसामान्यांना आकर्षित करतो. त्यामुळे या उत्सवाला नेहमीच गर्दी होत असल्याचे पाहायला मिळते. त्यातच गेल्या काही वर्षांपासून या उत्सवाला आलेल्या व्यावसायिक स्वरूपामुळे गर्दीत अधिकच भर पडली आहे. त्यामुळे जागोजागी आयोजित स्पर्धांच्या ठिकाणी गर्दीचे नियोजन, गर्दीची संधी साधून घडणारे गुन्हे, महिलाविरोधी गुन्हे रोखणे यांची विशेष दखल घेत यंत्रणा सज्ज झाली आहे. 

हेही वाचा : Krishna Janmashtami 2025 Wishes: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त तुमच्या नातेवाईक, मित्रपरिवाराला पाठवा 'या' शुभेच्छा

दरम्यान, उच्च न्यायालयाने, पोलीस आयुक्तालयाने त्या-त्या वेळी जारी केलेल्या डीजे, १४ वर्षांखालील गोविंदा, आदी मनाई आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठीही मनुष्यबळ जोडण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात स्थानिक पोलिसांनी आपापल्या हद्दीतील आयोजक, गोविंदा पथकांना अपघात प्रतिबंधक योजनांबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.