Mumbai Heavy Rain Alert : मुंबईत 'कोसळधार'; तज्ञांनी सांगितलं ढगफुटीसदृश्य पावसाचं नेमकं कारण
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातला आहे. मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबईसह कोकणाला पावसानं झोडपलं आहे. आज पहाटेपासून अचानक पावसाचा जोर वाढला असून मुंबईत पहाटेपासूनच पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल आहे. पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वे रुळांवरही पाणी साचले असून रेल्वेसेवा धिम्या गतीने सुरू आहे. मुंबई आणि कोकणच नाही तर उर्वरित महाराष्ट्रातही भयानक स्थिती आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. धरणं भरल्याने दरवाजे उघडण्यात आले आहेत. नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. विदर्भातही अति मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला. रस्त्यांना नदीचं रुप आलं, लोकांच्या घरात, शेतात पाणी शिरलं आहे.
अचानकपणे मुसळधार पडणाऱ्या पावसाबाबत मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रातील हवामान तज्ज्ञ शुभांगी भुते सांगितले की, सकाळपासून सतत धो-धो पाऊस सुरू आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्याचसोबत पूर्व-पश्चिम विभाग तयार झाला आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. संयुक्त प्रभाव म्हणून मुंबईसह कोकण आणि राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. पहाटेपासून पावसाने जोर धरला आहे.