Asia Cup 2025 India vs Pakistan : 'ठामपणे सांगतो, भारत विरूद्ध पाकिस्तान सामना रद्द होणार', माजी क्रिकेटपटूनं व्यक्त केला विश्वास
मुंबई : आशिया कप 2025 लवकरच पार पडणार आहे. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. वेळापत्रकानुसार हे पारंपारिक प्रतिस्पर्धी तीन वेळा आमनेसामने येऊ शकतात. मात्र भारत विरूद्ध पाकिस्तान सामना होणार नाही, असे मत माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी व्यक्त केले आहे. जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २० हून अधिक नागरिकांचा बळी गेल्याने निर्माण झालेल्या संतापामुळे भारत पाकिस्तानविरुद्ध खेळणारच नाही, असा विश्वास केदार जाधव याने व्यक्त केला आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कडक राजनैतिक उपाययोजना केल्या आणि ऑपरेशन सिंदूर नावाची लष्करी मोहीम राबवली.
दोन्ही संघ चॅम्पियनशिपमध्ये भेटतील की नाही, हे अनिश्चित असले तरी, क्रिकेटपटू, भाजप नेता केदार जाधव यांनी सांगितले की, भारत 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकेल. "मला वाटतं भारतीय संघाने अजिबात खेळू नये. भारताबद्दल सांगायचं झालं तर, मला वाटतं की भारत कुठेही खेळेल, तो नेहमीच जिंकेल, पण हा सामना अजिबात खेळू नये," असं जाधव यांनी सांगितलं.
गेल्या महिन्यात, युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील इंडिया चॅम्पियन्सने वर्ल्ड चॅम्पियनशिप लीगच्या दुसऱ्या हंगामात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांवर दोनदा बहिष्कार टाकला होता. गतविजेत्यांनी मोहम्मद हाफीज अँड कंपनीविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातून माघार घेतली. ज्यामुळे पाकिस्तानला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला, जिथे त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला.