Cho Hyun In India : स्वातंत्र्यदिनी दक्षिण कोरियाचे नवनियुक्ती परराष्ट्रमंत्री चो ह्युन करणार भारतात आगमन
नवी दिल्ली : दक्षिण कोरियाचे नवनियुक्त परराष्ट्र मंत्री चो ह्युन 15 ते 17 ऑगस्टदरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) सांगितले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एका मीडिया अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री शुक्रवारी संध्याकाळी नवी दिल्लीत येतील आणि शनिवारी परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांची भेट घेतील. या भेटीत भारत आणि दक्षिण कोरियामधील सेमीकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन, व्यापार आणि सागरी सुरक्षा यासारख्या क्षेत्रांमध्ये धोरणात्मक सहकार्य मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, अशी अपेक्षा आहे. चो ह्युन यांचा हा दौरा आशियाशी, विशेषतः इंडो-पॅसिफिक प्रदेशात, भारताचे संबंध वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. ते यापूर्वी 2015 ते 2017 पर्यंत भारताचे राजदूत होते. तसेच बहुपक्षीय राजनैतिकतेचे ते तज्ज्ञ आहेत. चो ह्युन यांनी नुकतेच डॉ. जयशंकर यांच्याशी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा केली होती.
यापूर्वी 28 जुलै रोजी, एक्सवरील एका पोस्टमध्ये, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दक्षिण कोरियाच्या समकक्षांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. 21 जुलै रोजी, परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी दक्षिण कोरियाचे नवे परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल चो ह्युन यांचे अभिनंदन केले. एक्सवरील एका पोस्टमध्ये, त्यांनी दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आणि नवी दिल्ली तसेच सोल यांच्यातील विशेष धोरणात्मक भागीदारी साध्य करण्यासाठी एकत्र काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. जुलैच्या सुरुवातीला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरियाच्या विशेष दूतांच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले होते. तर भारत-दक्षिण कोरिया भागीदारीच्या 10 वर्षांच्या पूर्ततेवर प्रकाश टाकला होता. त्यांनी अधोरेखित केले की दोन्ही देशांमधील जवळचे सहकार्य इंडो-पॅसिफिक प्रदेशात महत्त्वाची भूमिका बजावते.
त्याच दिवशी, परराष्ट्र मंत्री यांनी माजी पंतप्रधान किम बू-क्युम यांच्या नेतृत्वाखालील कोरिया प्रजासत्ताक (RoK) च्या विशेष दूतांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली, जे भारताच्या दौऱ्यावर होते. अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, संरक्षण, सागरी सुरक्षा आणि देवाणघेवाण यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. ग्रीन हायड्रोजन, जहाजबांधणी, गुंतवणूक, सेमीकंडक्टर आणि प्रादेशिक सुरक्षा, विशेषतः इंडो-पॅसिफिकमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही बाजूंनी नूतनीकरण केलेल्या प्रयत्नांदरम्यान ही बैठक झाली. गेल्या महिन्यात कॅनडामध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांची भेट झाल्यानंतर ही भेट झाली. दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, हरित ऊर्जा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात एकत्र काम करण्याची वचनबद्धता व्यक्त केली.