कोपरगाव येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रुक येथे आठ ऑगस्ट रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसानी तपास सुरु केला यामध्ये महिलेच्या पतीनेच कौटुंबिक वादातून तिचा खून केल्याचे समोर आले आहे. त्याला त्याचा मेहूण्याने मदत केल्याचेदेखील निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वनिता हिरामण हारावत-मोहिते असं मृत महिलेचे नाव आहे. ती अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडली होती. त्यामुळे महिलेची ओळख न पटल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी तीन जिल्ह्यांत विविध पथके रवाना केली होती.
तपासणी अहवालात महिलेचा गळा आवळून खून करून ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. पेट्रोल पंप, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत पोलिसांनी तपास केला.
बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनंतर तपासाला वेग :
महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा संशय वाढीस लागल्याने त्यादृष्टीने तपास करण्यात आला. त्यावरुन पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता, त्याने सदर महिला त्याची पहिली पत्नी असल्याचे सांगितले. कौटुंबिक वादातून साथीदाराच्या मदतीने तिचा खून केल्याची कबुली दिली असल्याचे वमने यांनी सांगितले.