छत्रपती संभाजीनगर: सरकारी नोकरीत असलेल्या एका व्यक्तीला फेसबुकवरील महिलेची मैत्री तब्बल 16 लाख 69 हजार 727 रुपयांना पडली आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी मिलिंद आश्रू म्हस्के (वय 54, रा. शिवाजीनगर, गारखेडा परिसर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 17 सप्टेंबर 2019 रोजी कॅलरा अमोंग नावाच्या महिलेने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. दोघांमध्ये चॅटिंगमधून मैत्री झाली आणि नंतर व्हॉट्सअॅप क्रमांकांची देवाणघेवाण झाली. दररोजच्या संभाषणामुळे विश्वास निर्माण झाला. काही दिवसांनी महिलेने मौल्यवान गिफ्ट्स व विदेशी चलन पाठविण्याचे सांगून पूर्ण पत्ता व माहिती मागवली.
यानंतर, दोन मोबाइल क्रमांकांवरून फोन आले. फोन करणाऱ्यांनी स्वतःला कस्टम अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, तुमचे पार्सल कस्टममध्ये अडकले असून, ते सोडवण्यासाठी कस्टम ड्युटी भरावी लागेल. अन्यथा पार्सल रद्द होईल, अशी भीती घातली. अधिक विश्वास निर्माण करण्यासाठी ईमेलवरून आयकार्डही पाठवण्यात आले.
या सर्व प्रकारानंतर, म्हस्के यांनी एका बँक खात्यातून 3 लाख 86 हजार 151 रुपये आणि दुसऱ्या खात्यातून 12 लाख 83 हजार 576 रुपये पाठवले. अशा प्रकारे एकूण 16 लाख 69 हजार 727 रुपये पाठवूनही पार्सल मिळाले नाही. अखेरीस फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली.