मुंबई: 16 ऑगस्ट रोजी देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. 'गोंविदा आला रे आला', 'अरे बोल बजरंग बली की जय' अशा गजरात अनेक गोविंदा मानाच्या हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशातच, अनेकांना प्रश्न पडला असेल की, भारतातील सर्वात मोठी दहीहंडी कोणती बरं? चला तर सविस्तर जाणून घ्या.
राम कदम दहीहंडी - घाटकोपर
भाजप नेते आमदार राम कदम यांनी आयोजित केलेली दहीहंडी ही भारतातील सर्वात मोठी दहीहंडी आहे. या दहीहंडी उत्सवात मोठ्या संख्येने गोविंदा पथके सामील होत असतात. साहसी खेळाचा दर्जा दहीहंडी उत्सवाला देण्यात आला असून आज या दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे गगनाला भिडणार आहेत. राम कदम आयोजित दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि भाजपचे मंत्री आमदार तसेच सिनेकलाकार आणि खेळाडू सुद्धा उपस्थिती लावणार आहेत.
'शोले' चित्रपटावर आधारित दहीहंडीची यंदाची थीम
राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडीची यंदाची थीम शोले चित्रपटावर आधारित आहे. विशेष म्हणजे, या उत्सवात 111 स्पॅनिश खेळाडू सहभागी होणार आहे आणि ते साहसी पिरॅमिडचा थरार दाखवणार आहेत. हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असेल.
यंदा, जागतिक विक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला तब्बल 21 लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. यासह, 9 थर लावणाऱ्या पहिल्या पथकाला 11 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच, 8 थर लावणाऱ्या पथकाला 25 हजार, 7 थरांसाठी 15 हजार आणि 6 थरांसाठी 10 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. यंदा, महिला पथकांनाही 7 थर लावण्याचे आव्हान असून, त्यांनाही योग्य बक्षिसे दिले जाईल. या दहीहंडी उत्सवात अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. यंदा शोले चित्रपट 50 व्या वर्षांत पदार्पण करत असल्याने त्यांनी ही थीम निवडली आहे.
धर्मवीर आनंद दिघे साहेबांची मानाची दहीहंडी - टेंभी नाका, ठाणे
उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ठाण्याच्या राजकीय आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेली ही दहीहंडी आयोजित केली जाते. तसेच, ही हंडी फोडण्यासाठी ठाणे आणि मुंबईतील गोविंदा पथकांमध्ये मोठी स्पर्धा असते. विशेष म्हणजे, या दहीहंडीत महिला गोविंदा पथकांनाही विशेष बक्षिसे देऊन सन्मानित केले जाते.
मनसे नेते अविनाश जाधव यांची दहीहंडी - नौपाडा, ठाणे
नेहमीप्रमाणे यंदाही मनसे नेते अविनास जाधव यांच्यावतीने ठाण्यातील भगवती मैदानात दहीहंडीचे आयोजिन करण्यात आले आहे. यंदा, मनसेच्या दहीहंडीमध्ये एकही सेलिब्रिटी उपस्थित राहणार नाही. त्यामुळे, यंदाची मनसेची दहीहंडी कशी असेल? याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. सेलिब्रिटींऐवजी प्रत्येक गेविंदा पथकातील थरामध्ये असणारा एक मुलगा सेलिब्रिटी असणार आहे. विशेष म्हणजे, त्या मुलाने व्यासपीठावर येऊन आपली कला सादर करायची आहे. यात, जो गोविंदा उत्कृष्टपणे आपली कला सादर करेल त्याला बक्षिस म्हणून इलेक्ट्रीक बाईक दिली जाईल.