लातूर: लातूर जिल्ह्यातील हासेगावच्या सेवालयातील एचआयव्ही(HIV) बाधित 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. सेवालयातील कर्मचाऱ्यानेच अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. आता हे प्रकरण औसा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पोलीस तपास सुरु आहे.
हासेगावच्या सेवालयात मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. सेवालयातील एका कर्मचाऱ्यानेच निघृण कृत्य केलं आहे. तसेच बलात्कारानंतर या कर्मचाऱ्याने मुलीचा गर्भपात देखील केला आहे. पीडित मुलगी सेवालयातून सुट्टी घेऊन धाराशिव जिल्ह्यात आजी-आजोबांकडे गेल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली.
पीडित मुलगी लातूरमधील हासेगावच्या सेवालयात शिक्षणासाठी राहत होती. तेथील एका कर्मचाऱ्याने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर मुलीला गर्भ राहिला मात्र नराधमाने तिचा गर्भपात केला. काही दिवसाने मुलगी तिच्या आजी आणि आजोबांकडे धारशिवला गेली. त्यावेळी घडलेला संपूर्ण प्रकार तिने आजी आणि आजोबांना सांगितला. यावेळीच पीडितेने तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले आणि तिचा गर्भपात केल्याचेही सांगितले. यानंतर आजी - आजोबांनी संपूर्ण प्रकार माहिती पडला.
हेही वाचा: मराठी नाही बोलली तर भोकं पडणार का?, केतकी चितळेचं वादग्रस्त विधान चर्चेत
पीडित तरुणीने तिच्या आजी- आजोबांकडे स्वत:ची व्यथा मांडली. त्यानंतर धाराशिवमधील ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आता लातूरमधील औसा पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती औसा पोलिसांनी सांगितली.
पीडित तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना समजल्यावर तिला पुन्हा सेवालयात पाठवायचं नाही असा निर्णय तिच्या आजी आणि आजोबांनी घेतला. यामुळे पीडितेची आजी तिचा शाळेचा दाखला मागण्यासाठी गेली. त्यावेळी आजीला दमदाटी करण्यात आली. दरम्यान, ही मुलगी त्या एचआयव्ही बाधित संस्थेत परत जात नाही म्हणून धाराशिव कल्याण समितीने विचारणा केली असता या मुलीने संपूर्ण प्रकार त्यांना सांगितला. यानंतर या घटनेला वाचा फुटली.