Thursday, August 21, 2025 04:58:32 AM

धक्कादायक! महाराष्ट्रात 19 वर्षांच्या महिलेने बसमध्ये दिला बाळाला जन्म

परभणीत 19 वर्षीय महिलेने बसमध्ये बाळाला जन्म दिला आणि नवजात बाळाला पतीच्या मदतीने बाहेर फेकले; बाळाचा जागीच मृत्यू, पोलिसांनी जोडपे ताब्यात घेतले.

धक्कादायक महाराष्ट्रात 19 वर्षांच्या महिलेने बसमध्ये दिला बाळाला जन्म

परभणी: महाराष्ट्रात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पुण्याहून परभणीकडे येणाऱ्या खासगी बसमध्ये 19 वर्षीय तरुणीने नवजात बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर तिच्या सोबत असलेल्या पुरुषाच्या मदतीने त्या नवजात बाळाला थेट बसच्या खिडकीतून बाहेर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या अमानुष कृत्यामुळे त्या नवजात बाळाचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी या जोडप्याला ताब्यात घेतले आहे.

ही घटना मंगळवारी (15 जुलै) पहाटे साडेसहाच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील पाथरी-सेलू रोडवर घडली. संत प्रयाग ट्रॅव्हल्सची पुण्याहून परभणीकडे जाणारी स्लीपर कोच बस होती. बसमध्ये प्रवास करत असलेल्या ऋतिका धेरे या 19 वर्षीय महिलेला अचानक प्रसूतीवेदना सुरु झाल्या. काही वेळातच तिने बसमध्येच बाळाला जन्म दिला. तिच्यासोबत प्रवास करणारा अल्ताफ शेख नावाचा इसम स्वतःला तिचा पती असल्याचे सांगत होता.

बाळ जन्मल्यानंतर त्या दोघांनी बाळाला एका कापडात गुंडाळून थेट बसच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले. या घटनेला बसच्या आजूबाजूच्या नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिले आणि त्यांनी तात्काळ बस थांबवून चालकाला विचारणा केली असता, त्यांनी सुरुवातीला महिला प्रवासामुळे अस्वस्थ होऊन उलटी करत होती, असे खोटे सांगितले. मात्र, नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बसचा पाठलाग करत त्या जोडप्याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतिका धेरे आणि अल्ताफ शेख हे दोघे परभणीचे रहिवासी असून, गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात राहत होते. हे दोघे एकमेकांना पती-पत्नी म्हणून संबोधत होते, मात्र विवाहाचे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नव्हते. पोलिसांनी त्या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेतील नव्या बीएनएस कायद्याच्या कलम 94 (3) आणि (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांनुसार जन्म झाल्यानंतर बाळाचा मृतदेह लपवणे किंवा त्याची चोरी करण्याचा प्रयत्न यावर कठोर शिक्षा होऊ शकते.

पोलिसांनी दोघांकडून प्राथमिक चौकशी दरम्यान माहिती घेतली असता, बाळाच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याची क्षमता आपल्याकडे नसल्यामुळे त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगितले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

या घटनेमुळे परभणी जिल्ह्यात तसेच राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. समाजमन हादरवणाऱ्या या घटनेने पुन्हा एकदा मानवी संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.


सम्बन्धित सामग्री