Thursday, August 21, 2025 04:41:31 AM

मालाडमध्ये शिक्षिकेचा क्रूरपणा! खराब हस्ताक्षरामुळे 8 वर्षांच्या विद्यार्थिनीच्या तळहाताला दिले पेटत्या मेणबत्तीचे चटके

हस्ताक्षर खराब असल्याचे कारण देत मालाडमधील खासगी शिकविणी घेणाऱ्या एका शिक्षिकेने 8 वर्षाच्या चिमुकल्या मुलाच्या हाताला मेणबत्तीचे चटके दिले आहेत.

मालाडमध्ये शिक्षिकेचा क्रूरपणा खराब हस्ताक्षरामुळे 8 वर्षांच्या विद्यार्थिनीच्या तळहाताला दिले पेटत्या मेणबत्तीचे चटके

मुंबई: हस्ताक्षर खराब असल्याचे कारण देत मालाडमधील खासगी शिकविणी घेणाऱ्या एका शिक्षिकेने 8 वर्षाच्या चिमुकल्या मुलाच्या हाताला मेणबत्तीचे चटके दिले आहेत. या कृत्यामुळे मुलाचा हात भाजला आहे. कुरार पोलिसांनी या शिक्षिकेविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

नेमकं घडलं काय?
मालाडमध्ये शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत संतापजनक कृत्य केले आहे. मुलाचे हस्ताक्षर चांगले नसल्याने त्याच्या हातावर मेणबत्तीचे चटके दिले आहेत. यामुळे शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार मुस्तकिन खान हे मालाड पूर्वेच्या पिंपरीपाडा येथे राहतात. त्यांचा मुलगा मोहम्मद हमजा खान हा लक्षधाम शाळेत तिसर्‍या इयत्तेत शिकतो. तो मालाड पूर्वेच्या गोकुलधाम येथील जेपी डेक्स इमारतीत राजश्री राठोड नावाच्या महिलेकडे शिकवणीसाठी जात होता. दररोज संध्याकाळी 7 ते 9 असे दोन तास ही शिकवणीचे वर्ग चालत होती. 28 जुलै रोजी संध्याकाळी नेहमीप्रमाणे हमजाची बहीण रुबिनाने त्याला शिकवणीसाठी राठोडच्या घरी सोडले होते. रात्री नऊच्या सुमारास शिक्षिका जयश्री राठोडने हमजाचे वडील मुस्तकीन खान यांना फोन केला. हमजा खूप रडत असून त्याला त्वरीत घरी घेऊन जा असे तिने सांगितले. हमजाची मोठी बहिण रुबीना त्याला घेण्यासाठी गेली होती. तेव्हा हमजा खूप रडत होता. त्याच्या उजव्या हातावर भाजल्याच्या गंभीर जखमा दिसून आल्या. रुबिनाने याबाबत राठोड यांना विचारले, तेव्हा तिने टोलवाटोलवीची उत्तरं दिली. घरी परतल्यावर हमजाने वडिलांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. राठोड टिचरने हस्ताक्षर खराब असल्याने शिक्षा म्हणून हात मेणबत्तीवर धरला होता असे हमजाने सांगितले. याबाबत खान यांनी राठोड यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा तिने मुलांना शिस्त लावण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली दिली. अशा प्रकारची शिक्षा देणे अमानवी कृत्य असून त्याबात खान यांनी जाब विचारला. त्यावेळी जयश्री राठोडनेच उलट शिवीगाळ केली, असे खान यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

हेही वाचा: पोलिसांवर गुन्हे दाखल करा; सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निकाल कायम

हमजाला उपचारासाठी कांदिवली पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात (शताब्दी) नेण्यात आले. खान यांनी कुरार गाव पोलीस ठाण्यात जयश्री राठोड विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 च्या कलम 75 तसेच भारतीय न्याय संहितेच्या 115 (2), 118 (1) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.


 


सम्बन्धित सामग्री