Wednesday, August 20, 2025 11:58:41 PM

कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार; तुरुंगात असलेल्या कुख्यात गुंडाने घेतली जबाबदारी

कपिल शर्मा याच्या कॅनडातील ‘कॅप्स कॅफे’वर पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅफेच्या खिडक्यांवर तब्बल 6 गोळ्यांचे निशाण सापडले आहेत.

कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार तुरुंगात असलेल्या कुख्यात गुंडाने घेतली जबाबदारी
Kapil Sharma's cafe shot again
Edited Image

टोरांटो: प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा याच्या कॅनडातील ‘कॅप्स कॅफे’वर पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने घेतली आहे. गेल्या महिन्यातही या कॅफेवर खलिस्तानी दहशतवाद्याने गोळीबार केला होता. स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी गोळ्या झाडण्यात आल्या. कॅफेच्या खिडक्यांवर तब्बल 6 गोळ्यांचे निशाण सापडले आहेत. एका महिन्याच्या कालावधीत हा दुसरा हल्ला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आतापर्यंत कपिल शर्माकडून याबाबत कोणतेही विधान आलेले नाही.

कपिल शर्माने काही महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये त्याचे कॅफे उघडला होता. त्याने या कॅफेचे नाव कॅप्स कॅफे ठेवले होते. परंतु 10 जुलै रोजी खलिस्तानी दहशतवाद्याने येथे गोळीबार केला होता. आरोपी हरजीतने दावा केला आहे की तो कपिल शर्माच्या काही टिप्पण्यांमुळे संतापला होता, त्यानंतर त्याने हे पाऊल उचलले. कपिलची पत्नी गिन्नीने काही दिवसांपूर्वी तिच्या कॅफेच्या उद्घाटनाची माहिती शेअर केली होती. त्यानंतर काही दिवसांनी कॅफेवर गोळीबार करण्यात आला होता. 

हेही वाचा - ''आम्ही हार मानणार नाही...''; कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लाडीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. तथापि, या हल्ल्यानंतर काही दिवसांनी हे कॅफे पुन्हा उघडण्यात आले. परंतु आता पुन्हा एकदा आज म्हणजेच गुरुवार, 7 ऑगस्ट 2025 रोजी येथे गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. परंतु यावेळी गोळीबाराची जबाबदारी तुरुंगात बंद असलेले गँगस्टर लॉरेन्स विश्नोईने घेतली आहे.

हेही वाचा - कॅनडामधील कपिल शर्माच्या कॅफेमध्ये गोळीबार; ''या'' दहशतवाद्याने स्विकारली जबाबदारी

लॉरेन्स बिश्नोई कोण आहे?

लॉरेन्स बिश्नोई हा गँगस्टर आणि अंडरवर्ल्डचा मोठा चेहरा मानला जातो. त्याच्यावर पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा आरोप आहे. याशिवाय, महाराष्ट्राचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी देखील बिश्नोईच्या टोळीने घेतली होती. सध्या तो तुरुंगात असून, आतूनच तो आपल्या गुन्हेगारी कारवाया चालवत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

कपिल शर्माकडून अद्याप प्रतिक्रिया नाही

या घटनेबाबत कपिल शर्माकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने तपास सुरु केला असून कॅफेच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे.
 


सम्बन्धित सामग्री