Chhaava Box Office Collection : ‘छावा’ची जबरदस्त कमाई! ६ दिवसात बॉक्स ऑफिसवर २०० करोड पार
विकी कौशल अभिनीत 'छावा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई करत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या सहा दिवसांतच २०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. खासकरून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी, चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली. छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे.
छावा २०० क्लबमध्ये सामिल
प्रसिद्ध समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी छावा चित्रपटाच्या कमाईबद्दलची माहिती त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिली आहे. यात त्यांनी छावाने २०० कोटींचा टप्पा गाठल्याचे म्हटलं आहे.
छावा चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ३३.१० कोटी रूपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी शनिवारी कमाईत वाढ झाली आणि दुसऱ्या दिवशी छावाने ३९.३० करोड रूपये कमावले. रविवारी छावाच्या कमाईत बंपर वाढ झाली. त्या दिवशी छावाने ४९.०३ करोड रूपयांचा गल्ला जमवला. सोमवारी २४.१० करोड रूपयांची तिकीटे विकली गेली. मंगळवारी २५.७५ करोड रूपयांचा गल्ला जमला. तर बुधवारी यात वाढ झाली आणि ३२.४० करोड रूपयांची कमाई झाली. छावाने ६ दिवसांत २०३ करोड रूपये कमावले आहेत.
हेही वाचा - अक्षय केळकरची शिवरायांना अनोखी मानवंदना,कलेतून साकारले छत्रपती शिवराय!
विकी कौशल बॉक्स ऑफिसवर 'छा गये'
'छावा' चित्रपटाच्या या यशामुळं विकी कौशल याने बॉक्स ऑफिसवर एक नवीन विक्रम नोंदवला आहे. २०१५ नंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्यांमध्ये विकी कौशल असा एकमेव अभिनेता बनला आहे. ज्याच्या दोन चित्रपटांनी २०० कोटीहून अधिकचा गल्ला बॉक्स ऑफिसवर केला आहे. छावाच्या आधी, २०१९ मध्ये आलेल्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या विकी कौशलच्या चित्रपटानं २०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती.
हेही वाचा - “छावा टॅक्स फ्री का नाही? मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट कारण!”
'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, अशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि नील भूपालम यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ए. आर. रहमान यांनी या चित्रपटाला संगीतबद्ध केलं आहे. या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण हे हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओ आणि रामोजी फिल्म सिटी येथे झाले आहे. चित्रपटाच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हीएफएक्स आणि ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे.