मुंबई: सध्या महाराष्ट्रात मराठी -हिंदी भाषा वाद चांगलाच चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता आणि मराठी बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याला काश्मीरच्या श्रीनगरमध्ये काश्मीरी दुकानदार भेटला. त्याने उत्कर्षसोबत मराठीत संवाद साधला आहे. या व्हिडीओला प्रेक्षकांची पसंती मिळत आहेत. तसेच हा व्हिडीओ पोस्ट करत उत्कर्षने भाषा वादावर भाष्य केलं आहे.
उत्कर्ष शिंदे नुकताच काश्मीरला गेला होता. तिथे वाणी ड्रायफ्रुट्सच्या दुकानातील दुकानदाराने त्याच्याशी मोडक्या तोडक्या भाषेत मराठीत संवाद केला. मुंबई?महाराष्ट्र मधून आले का तुम्ही? बसा बसा म्हणत त्या काश्मिरी दुकानदाराने मराठीत संवाद सुरू केला. यामुळे या दुकानदाराने मन जिंकले असल्याचे उत्कर्षने म्हटले आहे.
हेही वाचा: अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लागू; टॅरिफचा शेतकऱ्यांना मोठा फटका
'महाराष्ट्रात मराठी बोलायला काहीना शिकायचंच नाही म्हणे...'
महाराष्ट्रात मराठी बोलायला काहीना शिकायचंच नाही म्हणे. कोणतीही भाषा माणसे जोडण्यासाठी उदयास येते. पण काहींना त्यांचा धंदा महाराष्ट्रात करायचाय, पैसे इथून कमवायचे, रोज ट्रेन भरून लोंडेच्या लोंडे महाराष्ट्रात घेऊन यायचे पण भाषा मराठी शिकायची नाही का? असा सवाल यावेळी उत्कर्ष शिंदेने केला आहे. काश्मीरमधील दुकानातील हा प्रसंग सांगून त्याने महाराष्ट्रातील भाषा वादावर आपले मत मांडले आहे.
काय आहे उत्कर्षची पोस्ट?
उत्कर्ष म्हणाला, काश्मीरच्या श्रीनगरमध्ये वाणी ड्रायफ्रूट्सच्या दुकानात गेलो असता. मुंबई?महाराष्ट्र मधून आले का तुम्ही? बसा बसा म्हणत त्या काश्मिरी दुकानदाराने मराठीत संवाद सुरू केला. तोडका मोडका बोलत आमचे मराठी मन जिंकले. त्याला जर कळत असेल भाषा शिकल्याने मराठी माणसं अजून दोन गोष्टी जास्त घेतील.आपला धंदा चालेल. त्या काश्मिरी मुस्लिम बांधवांला कळाले हे भाषेच महत्व. त्याच्या मराठी बोलल्यामुळे 2 च्या जागी 10 गोष्टी घेतल्या आणि जयमहाराष्ट्र म्हणत “खुदाहाफिज फिर आयेंगे भाई “ म्हणत त्याच्या ही भाषेला मान देत तिथून निघालो. मराठी भाषा आपली नाही समजून काही माणसं दूर जातायेत त्यांना मला हेच सांगायच आहे. तुम्ही आमच्या मराठीला मान सन्मान द्या, आम्ही तुमच्या भाषेला मनात स्थान दिलेच आहे. हिंदी मराठी भाई भाई फिर मग कशाला करायची उगाच लढाई? असे त्याने म्हटले आहे.