Sunday, August 31, 2025 09:34:15 PM

कुणाल कामराने ठोठावला मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा; FIR रद्द करण्याची केली मागणी

कुणाल कामरा आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद गेल्या महिन्यात सुरू झाला, जेव्हा स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शोमध्ये त्यांच्यावर टीका केली.

कुणाल कामराने ठोठावला मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा fir रद्द करण्याची केली मागणी
Kunal Kamra
Edited Image

Kunal Kamra Moves Bombay HC: स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कामरा यांनी खार पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपमानास्पद वक्तव्य केले होते. कुणाल कामरा यांचे वरिष्ठ वकील नवरोज सेरवाई आणि वकील अश्विन थूल यांच्याकडून आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि एसएम मोडक यांच्या खंडपीठासमोर याचिकेचा उल्लेख केला जाईल.

कुणाल कामरा आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद गेल्या महिन्यात सुरू झाला, जेव्हा स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शोमध्ये त्यांच्यावर टीका केली. कामरा यांनी एका बॉलिवूड गाण्याचे विडंबन करून शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीवर व्यंग्य केले होते. कामरा यांची टिप्पणी 2022 मध्ये उद्धव ठाकरेंविरुद्ध शिंदे यांनी केलेल्या बंडाशी आणि महाविकास आघाडी सरकारच्या पतनाशी संबंधित होती.

हेही वाचा - Kunal Kamra Controvercy: कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या; BookMyShow ने नावासह हटवला विनोदी कलाकाराचा कंटेंट

हॅबिटॅट कॉमेडी स्टूडिओची तोडफोड - 

दरम्यान, 23 मार्च 2025 रोजी, कामराने हा व्हिडिओ त्याच्या यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. यानंतर, 24 मार्च रोजी, शिंदे गटातील शिवसैनिकांनी मुंबईतील खार परिसरातील हॅबिटॅट कॉमेडी क्लब आणि हॉटेल युनिकॉन्टिनेंटलमध्ये तोडफोड केली, जिथे हा कार्यक्रम रेकॉर्ड केला जात होता.

हेही वाचा - Kunal Kamra Gets Anticipatory Bail: कुणाल कामराला अटकेपासून मोठा दिलासा! मद्रास उच्च न्यायालयाने मंजूर केला अटकपूर्व जामीन

पोलिसांचे कामराला समन्स - 

तथापी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी असा दावा केला की कामरा यांनी शिंदे यांचा अपमान केला. त्यामुळे त्यांना अटक करण्यात यावी. याप्रकरणी, मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर देखील दाखल करण्यात आला. खार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 356 (2) (बदनामी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्याला तीन समन्स बजावले. कामरा 5 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. याशिवाय, जळगावचे महापौर आणि नाशिकमधील एका हॉटेल व्यावसायिकाने त्यांच्याविरुद्ध तक्रारी दाखल केल्या.
 


सम्बन्धित सामग्री