मुंबई: इन्स्टाग्रामवर लाईक्स मिळवण्यासाठी सुरू केलेलं काम विनोदवीर सागर कारंडेंला चांगलंच महागात पडलं आहे. फेब्रुवारी महिन्यात अनोळखी महिलेच्या संपर्कातून सुरू झालेला हा सोशल मीडियावर पैसे कमावण्याचा प्रकार अखेर 61 लाखांची फसवणूक ठरला. प्रत्येक लाईकला 150 रुपये देण्याचं आमिष दाखवण्यात आलं. सुरुवातीला काम केल्यावर काही रक्कम मिळाल्याने विश्वास बसला, पण नंतर भामट्यांनी गुंतवणूक आणि कमिशनच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकळले.
सुरुवातीला मिळालेला मोबदला आणि वॉलेटमध्ये दिसणारा वाढता नफा पाहून सागर कारंडे यांनी 27 लाखांची गुंतवणूक केली. त्यानंतर आणखी टास्कसाठी 19 लाख आणि त्यावर 30% कर भरावा लागल्याने एकूण रक्कम 61.83 लाखांवर पोहोचली. मात्र नफा काढण्याच्या प्रयत्नात सतत अडथळे येऊ लागल्यावर शंका आली आणि अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या गुन्ह्यात अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा: फुकट्यांकडून रेल्वेला मालामाल लॉटरी; वर्षभरात पावणेपाच लाख फुकटे प्रवासी गजाआड
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता सागर कारंडे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. त्याचे इन्स्टाग्रामवर तब्बल १०६ हजार फॉलोअर्स आहेत. पण याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील स्कॅममुळे सध्या तो चर्चेचा विषय ठरला आहे. चाहत्यांनी सागरला सहानुभूती दर्शवत, इतरांनाही अशा स्कॅमपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.