Mohammed Rafi Controversy: भारतीय संगीतसृष्टीत दिग्गज गायक मोहम्मद रफी, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचं नाव नेहमीच आदराने घेतलं जातं. मात्र या तिघांच्या नात्याविषयी वाद, अफवा आणि मतभेद यांची चर्चा अनेक दशकांपासून सुरु आहे. अलीकडेच रफींचे सुपुत्र शाहिद रफी यांनी या जुन्या वादावर भाष्य करताना काही धक्कादायक दावे केले आहेत.
शाहिद यांच्या म्हणण्यानुसार, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी मत्सर आणि असुरक्षिततेतून मोहम्मद रफी यांच्या कारकिर्दीला अडथळे आणले. अगदी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये रफींचं नाव जाणार होतं, तेव्हाही लतांनी हस्तक्षेप केला आणि अखेरीस हा सन्मान त्यांनाच मिळाला, असा गंभीर आरोप शाहिद यांनी केला.
'रफी साहेब नंबर वन होते, त्याचा हेवा वाटत होता'
शाहिद यांनी मुलाखतीत सांगितलं की, त्या काळात रफींच्या लोकप्रियतेला तोड नव्हती. लोक त्यांना सर्वोच्च गायक मानत होते. याचं लता मंगेशकरांना समाधान नव्हतं, असा दावा त्यांनी केला. 'त्यांना वाटायचं की त्यांच्या पुढे कोणी नसावं. पण माझे वडील त्यांच्यापेक्षा वरचढ होते. त्यामुळे त्यांना हेवा वाटला,' असं शाहिद म्हणाले.
हेही वाचा: Mithun Chakraborty: कुणाल घोष अडचणीत; मिथुन चक्रवर्तींनी दाखल केला 100 कोटींचा मानहानी खटला
रफींचं गायन थांबवण्यामागचं कारण
1970 च्या दशकात रफींनी काही काळ गाणं गाणं थांबवलं होतं. याविषयी शाहिद यांनी स्पष्ट केलं की, एका मौलवीने ‘गाणी म्हणणं पाप आहे’ असं सांगितल्यानंतर रफींनी स्वतःहून हा निर्णय घेतला होता. मात्र काही वर्षांनंतर त्यांनी पुन्हा इंडस्ट्रीत पुनरागमन केलं आणि चाहत्यांची मनं जिंकली.
आशा भोसलेंनी केलेलं वक्तव्य अयोग्य
शाहिद यांनी आशा भोसले यांच्या एका जुन्या वक्तव्यावरही कडाडून प्रतिक्रीया दिली. आशांनी रफींच्या आवाजात 'रेंज नव्हती' असं म्हटलं होतं. यावर शाहिद म्हणाले, 'या वयात थोडी लाज बाळगा. माझ्या वडिलांबद्दल कोणी वाईट बोललं तर मी शांत बसणार नाही. तुम्ही स्वतःबद्दल बोला, दुसऱ्यांना कमी लेखू नका.'
वैयक्तिक संबंधांवर परिणाम
या वादामुळे रफी आणि लता मंगेशकर यांच्यात तणाव निर्माण झाला होता. काही काळ दोघे एकमेकांशी बोलणंच बंद केलं होतं. मात्र नर्गिस आणि संगीतकार जयकिशन यांच्या आग्रहावरून त्यांनी एकत्र कार्यक्रम केला, तरी त्यांचे वैयक्तिक संबंध पूर्वीसारखे झाले नाहीत.
हेही वाचा: Deepika Padukone Louis Vuitton Prize 2025: कौतुकास्पद! जागतिक फॅशन मंचावर दीपिका पादुकोण करणार भारताचे प्रतिनिधित्व
'वडिलांविषयी कोणीही चुकीचं बोललं तर गप्प बसणार नाही'
शाहिद यांनी ठामपणे सांगितलं की, ते आपल्या वडिलांच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारी कोणतीही गोष्ट सहन करणार नाहीत. 'रफी साहेब 1960 च्या दशकात यशाच्या शिखरावर होते. आमच्यासाठी वेळच नव्हता. पण त्यांच्याबद्दल कोणतेही खोटे आरोप झाले, तर मी त्याला थेट उत्तर देईन,' असं ते म्हणाले.
1980 मध्ये फक्त 55 व्या वर्षी मोहम्मद रफी यांचं निधन झालं, पण त्यांच्या आवाजाचा वारसा आजही कायम आहे. मात्र या नव्या दाव्यांमुळे जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.